दारूची दुकाने उघडली; शहरातील गुन्हेगारीत वाढ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:43 AM2021-08-19T04:43:22+5:302021-08-19T04:43:22+5:30
स्टार 1064 (टेम्प्लेट) प्रशांत माने लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्याने दुकानांच्या वेळाही वाढल्या आहेत. ...
स्टार 1064 (टेम्प्लेट)
प्रशांत माने
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्याने दुकानांच्या वेळाही वाढल्या आहेत. यात ऑनलाइन विक्री करणारी दारूची दुकानेही आता खुली झाली आहेत. आता सर्व व्यवहार सुरळीत होताच, गुन्हेगारीत कमालीची वाढ झाली आहे. पैशांसाठी लुटमारीच्या घटना घडत असताना, आपापसात आणि घरामधील कुटुंबांमध्ये वाद होऊ लागले आहेत. या घटना दारूच्या नशेत घडल्याने दारूची दुकाने चालू झाल्यामुळे गुन्ह्यांमध्ये भर पडण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.
२२ मार्च ते ९ जून, २०२० या कोरोनाच्या पहिल्या लॉकडाऊनमध्ये दारूची दुकाने पूर्णत: बंद होती. त्यानंतर, अनलॉकमध्ये हळूहळू टप्प्याटप्प्याने निर्बंध उठविण्यात आले, परंतु होणारी गर्दी पाहता, मद्यविक्री थेट दुकानातून न करता, ऑनलाइनद्वारे पार्सल स्वरूपात विक्री करायला राज्य सरकारने मान्यता दिली. डिसेंबर, जानेवारीत काही ठरावीक वेळेसाठी मद्यविक्रीची दुकाने उघडण्यास परवानगी दिली होती. पुढे दुसऱ्या लाटेत ऑनलाइन मद्यविक्री सुरूच होती, परंतु बंद झालेली ही दुकाने पुन्हा निर्बंध उठल्यावर उघडली आहेत.
लॉकडाऊनमध्ये कमी झालेले गुन्हे अनलॉकमध्ये वाढले होते, पण आता दारूची दुकाने उघडल्याने त्यात भर पडायला लागली आहे. मद्यपान करताना किरकोळ वाद होणे, माझ्या घराजवळ दारू का पिता, अशी विचारणा करणाऱ्यास मारहाण करणे, या डोंबिवलीत घडलेल्या घटना असो, अथवा कल्याण-भिवंडी रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत जीप चालविणाऱ्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेणे असो, यातून दारूमुळे घडलेल्या गुन्ह्यांची प्रचिती येते. दारूच्या नशेत पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊन तिच्यावर आणि मुलीवर लोखंडी वस्तूने हल्ला केल्याची घटनाही नुकतीच कल्याण पूर्वेत घडली आहे. काही गुन्ह्यांचा अपवाद वगळता सर्वच गुन्हे दारूमुळे होत नाहीत. त्यामुळे दारूची दुकाने उघडल्याने गुन्हेगारीत वाढ झाली, असे म्हणणे योग्य नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
-----------------------------------------------
व्यसन हे मानसिक विकार
व्यसन ज्या वेळेला वाढत जाते, तेव्हा ते मिळविण्यासाठी पैसे घरात नसतील किंवा घरातल्या मंडळींकडून दिले जात नसतील, तर संबंधित व्यक्ती चोऱ्या माऱ्या करतो. त्याच्यातून गुन्हेगारी वाढत जाते. माणूस हा मुळात गुन्हेगार नसतो, परंतु व्यसनामुळे तो गुन्हेगारीकडे वळू शकतो. यात रागावर नियंत्रण राहत नाही, यात माणसाकडून चुकीची कृत्ये घडतात. व्यसनामुळे पती-पत्नीच्या नात्यात दुरावा निर्माण होतो. नैराश्य आणि चिंता या प्रमाणे व्यसनही मानसिक विकार आहे. यात शारीरिक आणि आर्थिक नुकसान होते. यात मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला आणि योग्य उपचार घेतले, तर व्यसनापासून माणूस पूर्णपणे परावृत्त होऊ शकतो.
- डॉ.अद्वैत पाध्ये, मानसोपचार तज्ज्ञ, डोंबिवली
------------------
पोलीस उपायुक्तांचे मौन
दारूची दुकाने उघडताच, गुन्हेगारी वाढली का, याबाबत परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी यावर कोणतेही भाष्य केले नाही.
-------------------------