भाईंदर पालिका प्रभाग १० च्या पोटनिवडणुकीसाठी २० हजार ७०९ मतदारांची यादी प्रसिद्ध
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2021 02:38 PM2021-02-21T14:38:11+5:302021-02-21T14:41:19+5:30
Mira Bhayander Municipal Corporation by-election : पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने सदर प्रभागातील मतदार यादी तयार करण्यासाठी कार्यक्रम जाहीर केला होता .
मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेतील शिवसेना गटनेते हरिश्चंद्र आमगावकर यांचे ९ जून २०२० रोजी कोरोना मुळे निधन झाल्याने रिक्त झालेल्या भाईंदर पूर्वेच्या प्रभाग १० मधील जागे साठी पोटनिवडणूक होणार आहे . त्या अनुषंगाने महापालिकेने २० हजार ७०९ मतदारांची मतदार यादी प्रसिद्ध केली असून त्यावर हरकत - सुचने साठी २३ फेब्रुवारी पर्यंतची मुदत दिली आहे .
भाईंदर पूर्वेच्या प्रभाग १० मध्ये ऑगस्ट २०१७ साली झालेल्या पालिका निवडणुकीत शिवसेनेच्या तारा घरत , हरिश्चंद्र आमगावकर, स्नेहा पांडे व जयंती पाटील असे चार नगरसेवक निवडून आले होते . परंतु कोरोना काळात प्रभागातील नागरिकांच्या मदतकार्यात सक्रिय असलेल्या आमगावकर यांना कोरोनाची लागण झाली . १३ दिवसांच्या कोरोना सोबतच्या झुंजी नंतर ९ जून रोजी त्यांची प्राणज्योत मालवली . दुसऱ्या दिवशी १० जून रोजी कोरोना मुळे त्यांच्या आईचे सुद्धा निधन झाले .
आमगावकर यांच्या निधना नंतर शिवसेना गटनेते पदी नीलम ढवण यांची नियुक्ती करण्यात आली . तर प्रभागात रिक्त झालेल्या एका जागेसाठी पोटनिवडणूक लढवण्याची तयारी भाजपाने सुरु केली होती . तर शिवसेने कडून दिवंगत हरिश्चंद्र आमगावकर यांच्या पत्नी पूजा यांना उमेदवारी दिली जाण्याचे निश्चित मानले जाते . पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने सदर प्रभागातील मतदार यादी तयार करण्यासाठी कार्यक्रम जाहीर केला होता .
२० हजार ७०९ मतदारांची मतदार यादी तयार करून १६ फेब्रुवारी रोजी पालिकेने ती प्रसिद्ध केली . त्या मध्ये ११ हजार ६५३ पुरुष मतदार तर ९ हजार ५५ महिला मतदार आहेत . १ अन्य मतदार आहे . सदर यादी पालिकेच्या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे . तसेच पालिका मुख्यालय व प्रभाग कार्यालयात सुद्धा ठेवली आहे . २३ फेब्रुवारी पर्यंत मतदार यादीतील मतदार माहिती बाबत हरकत - सूचना घेता येणार आहे . ३ मार्च रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे . ८ मार्च रोजी मतदार केंद्रांची माहिती प्रसिद्ध केली जाईल . तर १२ मार्च रोजी अंतिम मतदार यादी मतदान केंद्र निहाय यादी प्रसिद्ध केली जाणार आहे .