23,554 शेतकऱ्यांच्या याद्या कर्जमाफीसाठी पोर्टलवर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2020 12:28 AM2020-03-01T00:28:58+5:302020-03-01T06:47:01+5:30
कर्जमाफीसाठी जिव्हाळ्याची ठरलेली ‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना’ ख-या अर्थाने शनिवारपासून विनाविलंब सुरू झाली.
सुरेश लोखंडे
ठाणे : कर्जमाफीसाठी जिव्हाळ्याची ठरलेली ‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना’ ख-या अर्थाने शनिवारपासून विनाविलंब सुरू झाली. या कर्जमाफीसाठी ठाणे व पालघर जिल्ह्यातील २८ हजार ३९५ पैकी शनिवारी २३ हजार ५५४ पात्र शेतकऱ्यांची यादी राज्य शासनाने पोर्टलवर घोषित केली. त्यानुसार ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (टीडीसीसी) बँकेच्या ६९ शाखांमध्ये कामास प्रारंभ झाला. अंगठा घेतल्यानंतर कर्जमाफीची १६८ कोटी ५९ लाख १४ हजारांची रक्कम शेतक-यांच्या बँक खात्यात जमा होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे, असे टीडीसीसी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी सांगितले.
पोर्टलवर ठाणे जिल्ह्यातील १५ हजार ८११ खातेदारांपैकी १२ हजार ७६६ (८१ टक्के) लाभार्थी शेतकरी घोषित झाले. जिल्ह्यातील सर्व शेतकरी ९४ कोटी ५७ लाख २९ हजारांच्या कर्जमाफीला पात्र आहेत. तर, पालघर जिल्ह्यातील १२ हजार ५६८ पैकी १० हजार ७९० (८६ टक्के) शेतकºयांच्या याद्या पोर्टलवर आहेत. हा जिल्हा ७४ कोटी एक लाख ८४ हजारांच्या कर्जमाफीला पात्र आहे. या दोन्ही जिल्ह्यातील उर्वरित चार हजार ८१३ शेतकºयांच्या याद्यांचीदेखील लवकरच घोषणा होणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावनिहाय या कर्जमाफी शेतकºयांच्या याद्या जाहीर झाल्या आहेत. त्या लवकरच ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, शेती विकास सोसायटी तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संबंधित शाखेत शेतकºयांच्या माहितीसाठी लावल्या जाणार आहेत. बायोमेट्रिक पद्धतीने या शेतकºयांचा अंगठा घेतल्यानंतर त्यास त्वरित चारअंकी कोडनंबर मिळेल. तो लोड केल्यानंतर कर्जमाफीची रक्कम त्वरित आॅनलाइन दिसेल. त्यावरील ‘एस’ आॅप्शन टच केल्यास रक्कम बँक खात्यात जमा होईल. ‘नो’ आॅप्शन क्लिक केल्यास शेतकºयास कर्जमाफी मान्य नसल्याचे उघड होईल आणि ती तक्रार थेट जिल्हा समन्वय समितीकडे (डीएलसी) नोंद होईल. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर या समितीचे अध्यक्ष तर सदस्य सचिव जिल्हा उपनिबंधक शहाजी पाटील आहेत. समिती तक्रारीची दखल त्याच दिवशी घेऊन ती निकाली काढत आहे.
> शनिवारी १२ तक्रारींची नोंद
शनिवारी दुपारपर्यंत १२ तक्रारींची नोंद झाली. यातील तीन तक्रारी निकाली काढल्या. उर्वरित सात तक्रारी डीएलसीकडे तर दोन तहसीलदारांच्या पातळीवर नोंद झाल्या आहेत. शिवाय, शेतकºयांच्या बोटाचे ठसे उमटत नसल्याची समस्यादेखील जिल्ह्यात आहे. या तक्रारी तहसीलदारांकडे तर कर्जमाफी मान्य नसल्यास डीएलसीकडे तक्रारींची नोंद होत आहे.