उल्हासनगरमध्ये बोगस डॉक्टरांची यादी तयार, आयुक्तांच्या आदेशानंतर होणार कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 03:05 AM2017-09-09T03:05:03+5:302017-09-09T03:05:13+5:30
शहरातील बोगस डॉक्टरांची चौकशी पालिकेचा आरोग्य विभाग करत आहे. बोगस डॉक्टरांची काही नावे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजा रिजवानी यांच्याकडे असून आयुक्तांच्या आदेशानंतर कारवाई होणार आहेत.
उल्हासनगर : शहरातील बोगस डॉक्टरांची चौकशी पालिकेचा आरोग्य विभाग करत आहे. बोगस डॉक्टरांची काही नावे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजा रिजवानी यांच्याकडे असून आयुक्तांच्या आदेशानंतर कारवाई होणार आहेत. तसेच डॉक्टरांच्या चौकशीसाठी एका समितीची स्थापना करणार असल्याचे डॉ. रिजवानी यांनी सांगितले.
शहरातील झोपडपट्टी भागात राजरोसपणे बोगस डॉक्टरांनी दवाखाने सुरू केले आहेत. सामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळणाºया डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी समाजसेवक शिवाजी रगडे, नगरसेवक गजानन शेळके, सविता तोरणे-रगडे यांनी पालिकेकडे केली होती. गेल्या आठवडयात १६ वर्षाच्या मुलीचा तापाने काही तासात मृत्यू झाला. मृत मुलीच्या आई-वडिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेतल्यावर खरा प्रकार उघड झाला. या प्रकाराला रगडे यांनी वाचा फोडून बोगस डॉक्टरांविरोधात मोहीम उघडली.
महापालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी डॉ. रिजवानी यांना बोलावून या प्रकाराची चौकशी करण्यास सांगितले. तसेच बोगस डॉक्टरांविरोधात मोहीम उघडण्याचे आदेश दिले. समाजसेवक व नागरिकांनी काही बोगस डॉक्टरांची नावे रिजवानी यांच्याकडे दिली असून आयुक्तांच्या आदेशानुसार कारवाई करणार असल्याचे रिजवानी म्हणाले. तसेच बोगस डॉक्टरांचा छडा लावण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात येणार आहे. समितीत राजकीय नेत्यांसह पत्रकार, सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश आहे.