जगण्यायोग्य शहरांची यादी : विकासामुळे ठाण्याची बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 03:21 AM2018-08-14T03:21:21+5:302018-08-14T03:21:32+5:30
डिजी ठाणे प्रकल्पांतर्गत सुरू केलेले अॅप, तलावांचे सुशोभीकरण, सायकलपथ, रस्त्यांचे रुंदीकरण, महापालिका शाळांचे आधुनिकीकरण, उड्डाणपूल व भुयारी मार्गांची कामे, आयटी पार्कची उभारणी या व अशा अनेकविध कामांमुळे ‘जगण्यायोग्य शहरां’च्या यादीत ठाणे शहराने सहावा क्रमांक पटकावला आहे.
ठाणे - डिजी ठाणे प्रकल्पांतर्गत सुरू केलेले अॅप, तलावांचे सुशोभीकरण, सायकलपथ, रस्त्यांचे रुंदीकरण, महापालिका शाळांचे आधुनिकीकरण, उड्डाणपूल व भुयारी मार्गांची कामे, आयटी पार्कची उभारणी या व अशा अनेकविध कामांमुळे ‘जगण्यायोग्य शहरां’च्या यादीत ठाणे शहराने सहावा क्रमांक पटकावला आहे. कल्याण-डोंबिवली या शहरांचा वाहतूक, शैक्षणिक सोयी, घनकचरा व्यवस्थापन, प्रदूषण आदी निकषांवर पाडाव झाला.
केंद्रीय गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाने देशातील मोठ्या शहरांमधील ‘जीवनमान निर्देशांक’ प्रकल्प हाती घेतला असून त्या अनुषंगाने १० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असणाऱ्या देशातील १११ शहरांचे परीक्षण करून जाहीर केलेल्या ‘जगण्यायोग्य शहरां’च्या क्र मवारीत ठाणे शहराने आपले स्थान पक्के केले.
या यादीत राज्यातील पुणे शहर अव्वल असून नवी मुंबई दुसºया क्रमांकावर, तर राजधानी मुंबई तिसºया क्रमांकावर आहे. त्याखालाखोल ठाणे शहर सहाव्या क्रमांकावर आहे. मात्र, जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवलीची घसरगुंडी झाली, तर मीरा-भार्इंदर, उल्हासनगर, भिवंडी ही शहरे १० लाख लोकसंख्येच्या मर्यादेत बसली नाहीत.
‘फिजिकल, इन्स्टिट्युशनल, सोशल आणि इकॉनॉमिकल’ अशा चार मुख्य निकषांच्या अनुषंगाने तपासणी करण्यात आली. या चार निकषांमधील ‘इन्स्टिट्युशनल’ निकषात गव्हर्नन्स, अॅडमिनिस्ट्रेशन, आॅनलाइन सर्व्हिसेस यामध्ये सर्वाधिक गुण प्राप्त होऊन देशातील सर्वोत्तम प्रशासन प्रणाली राबवणाºया शहरात ठाणे सरस ठरले. जनतेला लाभदायक प्रशासकीय सेवा पुरवणे, माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून संगणकीय प्रणालीचा जास्तीतजास्त उपयोग करणे, तक्रार निवारण प्रणालीत नागरिकांना समाधानकारक उत्तर देणे, अशा विविध गोष्टींचे परीक्षण करण्यात आले. इतर तीन निकषांमध्ये ‘फिजिकल’ निकषात गृहनिर्माण, मोकळ्या जागा, ऊर्जास्रोत, पाणीपुरवठा आदी बाबींचा समावेश होता. ‘सोशल’ निकषात शिक्षण व आरोग्य त्याचप्रमाणे ‘इकॉनॉमिकल’ निकषात अर्थकारण व रोजगार या बाबींचा समावेश होता. केंद्राच्या समितीमार्फत प्रत्यक्ष भेटी व कागदपत्रे तपासणी याद्वारे हे परिक्षण करण्यात आले.
तलावांच्या सुशोभीकरणाने ठाणे चमकले
स्मार्ट सिटीअंतर्गत ठाणे महापालिकेने शहरात विविध उपक्रम हाती घेतले आहेत. यात डिजी ठाण्यासह विविध अॅप सुरू करून आॅनलाइन प्रशासकीय व्यवहारात आघाडी घेतली आहे. वाहतूक सुविधा, वीजपुरवठा यात ठाण्याने या परीक्षणात देशात पहिला, तर पाणीपुरवठ्यात चौथा क्रमांक मिळवला आहे.
खेळाची मैदाने, क्रीडांगणे विकसित करून खेळाडूंची मने जिंकली आहेत. तसेच येऊरसह रस्ता रुंदीकरणात विविध ठिकाणी सायकलपथ सुरू करून नागरिकांच्या तंदुरुस्तीची काळजी घेतली आहे. तलाव व्हिजनअंतर्गत अनेक तलावांचे सुशोभीकरण, गायमुख खाडीकिनारा
विकसित करून संध्याकाळी फिरण्यासाठी नागरिकांची सोय केली आहे.
महापालिकांचा शाळा दर्जा उंचावताना विद्यार्थ्यांना विविध सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत. शिवाय, शहरांत विविध ठिकाणी रस्ता रुंदीकरणासह अनेक ठिकाणी उड्डाणपूल, भुयारी मार्गाची कामे हाती घेऊन ठाणेकरांचा प्रवास सुकर केला आहे. शहरात अनेक आयटी पार्क, घोडबंदर विविध बांधकाम प्रकल्पांमुळे मोठा रोजगार उपलब्ध होऊन राहणीमानाचा दर्जा उंचावला आहे.
कल्याण-डोंबिवली शहरे मात्र सर्व आघाड्यांवर नापास झाली आहे. प्रशासकीय सेवा, वाहतूक सुविधा, शैक्षणिक सोयी, पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, प्रदूषण यात या महापालिकेचे आधीच हरित लवादासह अनेक संस्थांनी कान टोचले आहेत.