ऐका ठाणेकरांच्या खुलभर दुधाची कहाणी
By admin | Published: February 26, 2017 02:29 AM2017-02-26T02:29:22+5:302017-02-26T02:29:22+5:30
ऐका ठाणेकरांनो तुमची कहाणी... आटपाट नगर नव्हे तर सुशिक्षितांच्या, सुसंस्कृतांच्या, डोळस श्रद्धाळूंच्या, सांस्कृतिक ठाण्यात महाशिवरात्रीनिमित्त शिवपिंडीवर श्रद्धेपोटी वाहिले
ठाणे : ऐका ठाणेकरांनो तुमची कहाणी... आटपाट नगर नव्हे तर सुशिक्षितांच्या, सुसंस्कृतांच्या, डोळस श्रद्धाळूंच्या, सांस्कृतिक ठाण्यात महाशिवरात्रीनिमित्त शिवपिंडीवर श्रद्धेपोटी वाहिले जाणारे थोडेथोडके नव्हे तर तब्बल १७४ लीटर दूध रोट्रॅक्ट क्लब आॅफ ठाणे ग्रीन सिटीच्या तरुण स्वयंसेवकांच्या प्रयत्नामुळे समाजातील दुर्बल घटकातील मुलांच्या शुक्रवारी पोटात गेले.
महाशिवरात्रीला हजारो भाविक ठाण्यातील शिव मंदिरांमध्ये रांगा लावून शिवपिंडीवर दूधाचा अभिषेक करतात. हे दूध गरिबांना, अनाथांना देण्यात यावे याबाबत गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडियावर जनजागृती केली जात आहे. रोट्रॅक्ट क्लब आॅफ ठाणे ग्रीन सिटीच्या तरुण स्वयंसेवकांनी भाविकांकडून दूध गोळा करून ते दुर्बल घटकांपर्यंत पोहचवून समाजासमोर एक आदर्श उभा केला आहे.
महाशिवरात्रीच्या दिवशी ठाण्यात श्रद्धेपोटी दुग्धाभिषेक होत असताना आजूबाजूच्या परिसरातील अनाथालये, आदिवासी पाडे येथे मुलांच्या पोटात पुरेसे दूध जात नसल्याने ती भूकेने, कुपोषणाने प्राण सोडत असतात. शिवपिंडीवर अभिषेक केलेले दूध मोठ्या प्रमाणात वाया जाऊ नये आणि ते गरिबांच्या मुखी जावे या उद्देशाने रोट्रॅक्ट क्लब आॅफ मुंबई मुलुंड साऊथ या संस्थेने ‘द व्हाईट रेव्होल्यूशन’ हा उपक्रम राबवला आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत रोट्रॅक्ट क्लब आॅफ ठाणे ग्रीन सिटीने मागील वर्षापासून ठाण्यामध्ये देखील हा उपक्रम राबवायला सुरुवात केली.
ठाण्यातील तरुण हे दूध फक्त गोळा करत नाहीत तर त्यामध्ये साखर आणि वेगवेगळे स्वाद मिसळून समाजातील दुर्बल घटकांपर्यंत पोहचवतात. यंदा जास्तीत जास्त दूध गोळा करणे हे ध्येय होते. ठाणे पूर्व येथील शिव मंदिराच्या परिसरात हा उपक्रम राबविला. २४ फेब्रुवारी रोजी पहाटे तीन वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजेपर्यंत ४० स्वयंसेवक मंदिरांत उपस्थित होते. पिंडीवर एक चमचा दूध भक्ती आणि श्रद्धेसाठी अर्पून उर्वरित दूध गरीब मुलांच्या पोटात जाण्याकरिता द्यावे, असे या तरुणांनी भाविकांना आवाहन केले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सूज्ञ ठाणेकरांनी आम्ही शिवपिंडीवरच दुग्धाभिषेक करणार, असा दुराग्रह न बाळगता या आवाहनाला उदंड प्रतिसाद दिला. संस्थेने १७४ लीटर दूध गोळा केले. हा आकडामागील वर्षीच्या दूध संकलनापेक्षा दुप्पट होता. हे दूध पिंपामध्ये गोळा करून थंड करण्यात आले. त्यानंतर आनंद भारती समाज सभागृहामध्ये ते काळजीपूर्वक उकळवून त्याचे मसाला दूध तयार करण्यात आले. (प्रतिनिधी)