आजपासून ठाणेकरांना साहित्यिक मेजवानी; ठाणे साहित्य महोत्सवाचे आज उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2024 07:44 AM2024-02-24T07:44:47+5:302024-02-24T07:45:24+5:30
२४ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत हा साहित्यगजर होणार आहे. पाॅप्युलर प्रकाशनचे प्रमुख रामदास भटकळ यांना ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.
ठाणे : मराठी राजभाषा दिनानिमित्त पुस्तक प्रदर्शन, काव्यकट्टा, वर्दीतील दर्दी, नक्षत्रांची गाणी आणि ख्यातनाम साहित्यिकांचा सत्कार अशा विविध कार्यक्रमांनी ठाणे शहरात भव्य-दिव्य साहित्य महोत्सव उत्तरोत्तर रंगणार आहे. ‘लोकमत’ने आयोजित केलेल्या या महोत्सवात कथा, कादंबरी, कविता, चरित्र, वैचारिक, अनुवाद अशा विविध क्षेत्रांत आपल्या लेखनाने वेगळा ठसा उमटविणाऱ्या लेखक, कवी आणि पुस्तकांचा गौरव सोहळा होणार आहे. २४ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत हा साहित्यगजर होणार आहे. पाॅप्युलर प्रकाशनचे प्रमुख रामदास भटकळ यांना ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.
कोरम मॉल येथे २४ ते २६ या काळात कविवर्य कुसुमाग्रज ग्रंथदालनात रसिकांना साहित्य-सांस्कृतिक मेजवानी मिळेल. २४ फेब्रुवारीला सकाळी ११ वा. ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर, ज्येष्ठ लेखक निळू दामले, ज्येष्ठ समीक्षक डॉ. अनंत देशमुख, अभिनेते मंगेश देसाई, ‘एमसीएचआय’चे जितेंद्र मेहता आदींच्या उपस्थितीत ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.
आज सायंकाळी काव्यकट्टा
ठाणे शहरातील नामवंत कवी-कवयित्री या काव्यकट्ट्यावर आपल्या कविता शनिवारी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत सादर करणार आहेत. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद ज्येष्ठ कवयित्री डॉ. प्रज्ञा दया पवार या भूषविणार आहेत. या काव्यकट्ट्याचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदिका डॉ. प्रतीक्षा बोर्डे करणार आहेत.
‘वर्दीतील दर्दी’
२५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत ‘वर्दीतील दर्दी’ या कार्यक्रमाने दुसरे पुष्प गुंफले जाणार आहे. ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. प्रशासकीय अधिकारी आपल्या कविता, गझल यावेळी सादर करणार आहेत. पोलिस, ठाणे महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी यात सहभागी होऊन त्यांच्या कला सादर करतील.
साहित्य पुरस्कार वितरण
२७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषादिनी साहित्य पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन सायंकाळी ५:३० वाजता गडकरी रंगायतन येथे केले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ‘लोकमत एडिटोरिअल बोर्डा’चे चेअरमन डॉ. विजय दर्डा भूषविणार आहेत. पाॅप्युलर प्रकाशनचे प्रमुख रामदास भटकळ यांना ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित केले जाणार असून, प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ लेखक श्याम मनोहर उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्याचे विशेष आकर्षण असणार आहे, ते राष्ट्रीय पुरस्कार विजेते गीतकार स्वानंद किरकिरे यांची विशेष मुलाखत अपर्णा पाडगावकर घेतील.
प्रख्यात सुलेखनकार अच्युत पालव ‘अक्षर संवाद’ या उपक्रमाच्या माध्यमातून उपस्थित रसिकांना प्रात्यक्षिक करून दाखवतील तसेच पुस्तकाच्या कव्हरचे महत्त्व असते तरी काय, हे देखील उपस्थितांना दाखवून देतील.
जीवनगौरव पुरस्कार प्रदान केल्यानंतर ज्येष्ठ साहित्यिक, प्रकाशक रामदास भटकळ यांच्याशी संवाद साधणार आहेत. यावेळी अभिनेते किशोर कदम, साहित्य पुरस्कारांचे परीक्षक अरुणा ढेरे, वैभव मांगले, नीरजा, सुहास किर्लोस्कर, वंदना अत्रे, अक्षय शिंपी उपस्थित राहणार आहेत.