साहित्यिक किरण येले यांना बी. रघुनाथ पुरस्कार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:42 AM2021-09-03T04:42:47+5:302021-09-03T04:42:47+5:30
कल्याण : कवी, कथाकार आणि नाटककार किरण येले यांना यंदाचा बी. रघुनाथ पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण ...
कल्याण : कवी, कथाकार आणि नाटककार किरण येले यांना यंदाचा बी. रघुनाथ पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण बी. रघुनाथ यांच्या स्मृतिदिनी औरंगाबाद येथे ७ सप्टेंबरला प्रसिद्ध लेखिका व कवयित्री अनुराधा पाटील यांच्या हस्ते होणार आहे. नाथ समूह आणि परिवर्तन संस्था यांच्यातर्फे ३२ वर्षांपासून हा पुरस्कार दिला जात आहेत.
येले यांच्या तिसरा डुळा या कथासंग्रहाला हा पुरस्कार जाहीर झाला आहे. येले यांनी चौथ्यांच्या कविता आणि बाईच्या कविता हे दोन कविता संग्रह लिहिलेले आहेत. त्यापैकी बाईच्या कविता हा कविता संग्रह, तसेच मोराची बायको हा कथासंग्रह गाजला. प्लॅटफार्म नंबर ९ हे नाटक त्यांनी लिहिलेले आहे. एक चाल सोंगटीची, १५ ऑगस्ट आणि चित्ता या चित्रपटांच्या पटकथा त्यांनी लिहिल्या आहेत. शुभंकरोती, मन उधाण वाऱ्याचे, लक्ष्य, अस्मिता, नवे लक्ष्य, सावित्री ज्योती या मालिकांचे लेखन त्यांनी केले आहे. त्यांना महाराष्ट्र फाऊंडेशनचा पुरस्कार मिळाला आहे. लोककवी वामन कर्डक जन्मशताब्दी महोत्सव समितीचे ते अध्यक्ष आहेत.
दरम्यान, बी. रघुनाथ पुरस्कार समितीवर प्रा. अजित दळवी, दासू वैद्य, श्रीकांत उमरीकर यांनी काम पाहिले. तर, नाथ समूहाचे नंदकिशोर कागलीवाल, संतोष जोशी, सतीश कागलीवाल, शीव फाळके, ‘परिवर्तन’चे डॉ. सुनील देशपांडे, प्रा. मोहन फुले, डॉ. आनंद निकाळजे यांनी रसिकांच्या सहकार्यामुळे हे काम पुढे सुरू आहे, असे नमूद केले.
यापूर्वीचे पुरस्काराचे मानकरी
भास्कर चंदनशीव, रंगनाथ पठारे, नागनाथ कोतापल्ले, फ. मु. शिंदे, निरंजन उजगरे, भारत सासणे, नारायण कवठेकर, बालाजी सुतार आदींना यापूर्वी हा पुरस्कार मिळाला आहे.
-----------