'साहित्य संमेलन खऱ्या अर्थाने वैश्विक होईल'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 10:38 PM2019-09-24T22:38:27+5:302019-09-24T22:38:49+5:30
मराठी साहित्य जगतातील प्रतिक्रिया; फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अध्यक्षपदी निवडीचे स्वागत
- जान्हवी मोर्ये
डोंबिवली : उस्मानाबाद येथे होणाºया अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची एकमताने निवड झाली आहे. साहित्यिक क्षेत्राने त्यांच्या निवडीचे स्वागत केले आहे. मराठी साहित्य संमेलनात ख्रिस्ती धर्मगुरू असलेल्या साहित्यिकाची निवड झाल्याने हे संमेलन खºया अर्थाने वैश्विक होईल, अशी प्रतिक्रिया साहित्यिक क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
दिब्रिटो यांच्या निवडीमुळे अखिल भारतीय साहित्य संमेलन हे वैश्विक होत असल्याची ही खूण आहे. दिब्रिटो हे करुणेचे उपासक आहेत. त्यांचे साहित्य हे मराठी साहित्याला साहित्यांचा आयाम विकसित करणारे आहे. त्यामुळे एकंदरच साहित्य संमेलनाची निवड समिती आणि महामंडळ हे सर्व समावेशक होत आहे, याचा मला आनंद झाला. दिब्रिटो यांच्याकडे मी एक साहित्याचा उपासक म्हणून पाहतो. आपल्या लेखनातून आणि व्याख्यानातून ५० वर्षे त्यांनी मने जोडण्याचे काम केले. म्हणूनच ते कोणत्याही राजकारणात, हवेदाव्यात नाहीत. अजातशत्रू असे ते व्यक्तिमत्त्व आहे, त्यामुळे त्यांचे नाव एकमताने निवडल्यामुळे पुढील पिढीतील साहित्यिक म्हणून व मी त्यांचा एक चाहता या नात्याने आनंद व्यक्त करीत आहे, असे मत प्रसिद्ध कवी प्रवीण दवणे यांनी व्यक्त केला.
साहित्यिक वामनराव देशपांडे यांनीही या निवडीबाबत आनंद व्यक्त केला. ही व्यक्ती गुणग्राहक, सज्जन आहे. सामान्य लोकांना त्यांचे नाव फारसे माहीत नव्हते. ना. धों. महानोर यांच्या नावाची घोषणा होईल, असे मला वाटत होते. पण, तसे झाले नाही. साहित्यिक या दृष्टीने दिब्रिटो यांच्याकडे पाहिले पाहिजे. त्यांचा धर्म, जात कोणती आहे, हे पाहू नये. आता हा भेद केला जातोय, तो योग्य नाही. पण माझ्या दृष्टीने त्यांची निवड योग्य आहे. २१ व्या शतकापासून साहित्य लोप पावले आहे. वाचकांची संख्या रोडवली आहे. पु.भा. भावे, व. पु. काळे असे लेखक आता होणे नाही. आता पुस्तके मनोरंजनाचे साधन राहिलेले नाही. वृत्तपत्रही वाचली जात नाहीत. साहित्यिक वातावरण बदलेले आहे. साहित्यात रात्र झाली आहे पण अरुणोदय होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
‘सर्वसमावेशक दृष्टिकोन मांडतील’
लेखक व प्रकाशक सुरेश देशपांडे यांनी दिब्रिटो यांच्या निवडीचे स्वागत केले आहे. पण त्यांच्या निवडीने समस्त साहित्य क्षेत्राला आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यांचे नाव चर्चेत नव्हते. दिब्रिटो हे मुळात धर्मप्रसारक, धर्मरक्षक. पण त्यांची जाणीव पर्यावरणीय पुस्तकांतून दिसली आहे. त्यावरून निसर्ग आणि मानव यांच्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन हा सहृदय आहे.
त्यांच्या ख्रिस्ती धर्मांवरील पुस्तकांमुळे ते प्रचारक असावेत, असेही काही लोकांना वाटते. आता अध्यक्षपदावरून भाषण करताना ते सर्वसमावेशक, असा दृष्टिकोन मांडतील असे वाटते. त्यांच्या अध्यक्षपदाचे स्वागत प्रत्येक घरांत व्हावे, अशी अपेक्षा आहे. कारण अध्यक्षपदावर निवडून येणारी माणसे ही नेहमी मोठीच असतात, असे ते पुढे म्हणाले.