कल्याणमध्ये साहित्य संमेलन?
By admin | Published: April 25, 2016 03:05 AM2016-04-25T03:05:21+5:302016-04-25T03:05:21+5:30
नाट्यसंमेलन ठाण्यात संपन्न झाल्यावर ९० वे अ.भा. साहित्यसंमेलन कल्याण-डोंबिवलीमध्ये व्हावे, याकरिता तेथील साहित्यिक, कवी, समीक्षक, ग्रंथालये यांनी कसून प्रयत्न सुरू केले
ठाणे : नाट्यसंमेलन ठाण्यात संपन्न झाल्यावर ९० वे अ.भा. साहित्यसंमेलन कल्याण-डोंबिवलीमध्ये व्हावे, याकरिता तेथील साहित्यिक, कवी, समीक्षक, ग्रंथालये यांनी कसून प्रयत्न सुरू केले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विदर्भातील असल्याने आणि साहित्य मंडळाचा कारभार विदर्भाकडे सोपवला जाणार असल्याने संमेलन विदर्भात घेण्याचा आग्रह तेथील साहित्य विश्वातून होण्याची दाट शक्यता आहे. मात्र, स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्याला मुख्यमंत्र्यांना बगल द्यायची असेल तर कल्याण-डोंबिवलीकरांचा दावा प्रबळ होऊ शकतो, अशी साहित्य वर्तुळात चर्चा आहे.
महामंडळाची बैठक येत्या ३० एप्रिल रोजी नागपूर येथे होत असून त्यामध्ये ३१ मार्चपूर्वी संमेलनाकरिता आलेले एकमेव कल्याण-डोंबिवलीचे निमंत्रण स्वीकारायचे की, आणखी मुदत देऊन निमंत्रणे मागवायची, याचा निर्णय होणार आहे.
कल्याण-डोंबिवलीमधील साहित्यिक गेली पाच वर्षे संमेलन आपल्याकडे व्हावे, याकरिता पाठपुरावा करीत आहेत. मात्र, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे जे १७५ सदस्य संमेलनाच्या अध्यक्षांची निवड करतात, त्यामध्ये कल्याण-डोंबिवलीमधील केवळ हाताच्या बोटांवर मोजता येतील, एवढेच सदस्य आहेत. राज्यातील वेगवेगळ्या साहित्य परिषदा व संस्थांच्या सदस्यांची संख्या १३०० ते १४०० असून त्यामध्ये डोंबिवलीतील १८०, तर कल्याणमधील १८९ सदस्य आहेत. निर्णय प्रक्रियेत इतके कमी प्रतिनिधित्व दिले गेल्याने या सांस्कृतिक शहरांची डाळ शिजलेली नाही.
मसापचे नवीन कार्याध्यक्ष मिलिंद जोशी यांनी अलीकडेच कल्याणला भेट दिली, तेव्हा साहित्यसंमेलन आयोजित करण्याची तयारी कल्याण सार्वजनिक वाचनालयाने व स्थानिक लेखक, कवी यांना दाखवली. जोशी यांनीही या प्रस्तावाचे स्वागत केले. मात्र, संमेलनाच्या आयोजनाची धुरा मिळवणे, तेवढी सोपी गोष्ट नाही.
गेली तीन वर्षे साहित्य मंडळाचे कार्यालय पुण्याकडे होते. त्यामुळे ८९ व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद श्रीपाल सबनीस यांना मिळवून देण्यात शरद पवार व पश्चिम महाराष्ट्रातील बड्या राजकीय नेत्यांनी प्रयत्न केले. आता साहित्य मंडळाचे कार्यालय पुढील तीन वर्षांकरिता विदर्भात हलवण्यात येईल.
राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विदर्भातील देवेंद्र फडणवीस असताना साहजिकच विदर्भाकडे ९० व्या साहित्य संमेलनाची धुरा जावी, असा आग्रह तेथील साहित्यिकांकडून धरला जाणार, हे उघड आहे. त्यानंतर, साहित्य मंडळाची धुरा मराठवाडा व त्यानंतर मुंबईकडे येईल म्हणजे कल्याण-डोंबिवलीस संमेलनाकरिता पुन्हा किमान सहा वर्षे वाट पाहावी लागेल. (प्रतिनिधी)
> गेली तीन वर्षे साहित्य मंडळाचे कार्यालय पुण्याकडे होते. त्यामुळे ८९ व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद श्रीपाल सबनीस यांना मिळवून देण्यात शरद पवार व पश्चिम महाराष्ट्रातील बड्या राजकीय नेत्यांनी प्रयत्न केले. आता पुढील तीन वर्षांकरिता कार्यालय विदर्भात हलवण्यात येईल. स्वतंत्र विदर्भाची मागणी व संमेलनात तसा ठराव आणण्याकरिता विदर्भातील साहित्यिकांचा रेटा टाळण्यासाठी खुद्द फडणवीस हेच कल्याण-डोंबिवलीच्या पारड्यात संमेलनाचे दान टाकू शकतात, असे स्थानिकांना वाटते.
> साहित्यसंमेलनाच्या आयोजनाकरिता आतापर्यंत केवळ कल्याण-डोंबिवलीचा प्रस्ताव आला आहे. येत्या ३० एप्रिल रोजी नागपूर येथील बैठकीत हाच प्रस्ताव स्वीकारायचा की, आणखी काही प्रस्ताव मागवायचे, याचा निर्णय घेतला जाईल. कल्याणमधील वाचनालय गेली कित्येक वर्षे निष्ठेने काम करीत असून कल्याण-डोंबिवलीस साहित्यसंमेलनाच्या आयोजनाची संधी दिली गेली, तर तेथे निर्माण होणाऱ्या वाड्.मयीन वातावरणामुळे साहित्य चळवळीला निश्चित बळ मिळेल.
- मिलिंद जोशी, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद