साहित्य संमेलन तयारी घटस्थापनेपासून!
By admin | Published: September 27, 2016 03:33 AM2016-09-27T03:33:45+5:302016-09-27T03:33:45+5:30
यंदाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन डोेंबिवलीत होणार असल्याने त्याच्या प्राथमिक कामांना वेग आला असून पितृपक्ष संपताच नवरात्रीच्या पहिल्या दिवशी संमेलनाच्या
डोंबिवली : यंदाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन डोेंबिवलीत होणार असल्याने त्याच्या प्राथमिक कामांना वेग आला असून पितृपक्ष संपताच नवरात्रीच्या पहिल्या दिवशी संमेलनाच्या तयारीची घटस्थापना केली जाणार आहे. डोंबिवलीचे ग्रामदैवत असलेल्या गणेशाला साक्षी ठेवून चांगल्या कार्याची सुरुवात केली जाते. तशीच साहित्य संमेलनाच्या कामांची सुरुवातही नवरात्रीचा पहिल्या दिवशी गणेश मंदिरातून केली जाणार आहे. त्यात संमेलनाच्या यशस्वीतेचा संकल्प करणार असल्याचे आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे यांनी सांगितले.
एकीकडे अध्यक्षपदाच्या निवडीत रंग भरत असतानाच संमेलनाच्या अपेक्षांसंदर्भातील चर्चांना वेग आला आहे. संमेलनाचा मुख्य मंडप डोंबिवली क्रीडा संकुलात उभारण्याचे ठरले असले, तरी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाला विचारून त्याचा आकार ठरविला जाणार आहे. मंडपावर चर्चा करण्यासाठी नुकतीच प्राथमिक बैठक पार पडली. तिला शहरातील वास्तूविशारद राजीव तायशेट्ये उपस्थित होते, तर कला दिग्दर्शक संजीव धबडे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून व्यासपीठाची रचना, त्याची सजावट याबाबत काम करण्याबाबत सुचविण्यात आले आहे.
पितृपक्ष असल्याने संमेलनाच्या कामाचा शुभारंभ फोरमसह मसापच्या पदाधिकाऱ्यांनी टाळला होता. १ आॅक्टोबरला नवरात्रीचा पहिला दिवस आहे. त्या दिवशी आगरी युथ फोरमसह मसाप आणि गणेश मंदिर संस्थानचे पदाधिकारी सायंकाळी ५.३० च्या मुहूर्तावर मंदिरात जातील आणि तेथे साहित्य संमेलनाच्या यशस्वीतेचा संकल्प करतील. त्यानंतर ९ आॅक्टोबरला अष्टमीच्या दिवशी मान्यवरांची पहिली औपचारिक बैठक घेतली जाणार आहे. त्यात संमेलनाला साह्य करण्यासाठी, त्यातील सहभाग वाढविण्यासाठी विविध मान्यवरांना, संस्थांना निमंत्रित केले जाईल.
गणेश मंदिर संस्थानचा सहभाग पहिल्या दिवशी असल्याने त्यांच्यासह अन्य संस्थांचा सहभाग हळूहळू वाढत जाईल. त्यांच्या कल्पना, सूचना समजून घेतल्यावर संमेलन तयारीला आकार येईल. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ समीक्षक म. सु. पाटील यांचे नाव चर्चेत आल्यावर पाटील यांच्या भेटीसाठी फोरमची मंडळी त्यांच्या मुलुंड येथील घरी जाणार असल्याची चर्चा होती. मात्र अध्यक्ष निवडीच्या विषयाशी आयोजकांचा संबंध नसल्याने फोरमची मंडळी त्यांच्या भेटीला गेली नाहीत. तशी भेट घेणार असल्याचे वझे यांनी नाकारले. (प्रतिनिधी)
आगरी महोत्सवातून संमेलनाचा प्रसार : साहित्य संमेलनच्या साधारण महिनाभर आधी फोरमचा आगरी महोत्सव होईल. तो डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात अपेक्षित आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे तो यशस्वी करणे आणि त्यानंतर लगेच संमेलनाच्या तयारीचे आव्हान फोरमच्या खांद्यावर आहे. आगरी महोत्सवाबरोबरच संमेलनाच्या यशस्वी आयोजनावर अधिक भर दिला जाणार आहे. संमेलन घराघरात पोहचविण्यासाठी या आगरी महोत्सवाचा उपयोग होईल. लाखो लोक या महोत्सवाला भेट देतात. त्यामुळे त्यांना तेथेच साहित्य संमेलनाविषयी माहिती दिली जाईल, असे वझे यांनी सांगितले.