प्रत्येक बसचे कळणार लाइव्ह लोकेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:50 AM2021-07-07T04:50:26+5:302021-07-07T04:50:26+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : कल्याण एसटी बसस्थानकातून दररोज आसपासच्या परिसरासह लांबपल्ल्यांच्या बस सुटतात. या बसस्थानकातून लॉकडाऊनपूर्वी दररोज २५ ...

Live location of each bus | प्रत्येक बसचे कळणार लाइव्ह लोकेशन

प्रत्येक बसचे कळणार लाइव्ह लोकेशन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : कल्याण एसटी बसस्थानकातून दररोज आसपासच्या परिसरासह लांबपल्ल्यांच्या बस सुटतात. या बसस्थानकातून लॉकडाऊनपूर्वी दररोज २५ हजार प्रवासी प्रवास करत होते. सध्या बस पूर्ण क्षमतेनुसार धावत असल्या तरी १० हजार प्रवासी प्रवास करीत आहेत. उपनगरी लोकल सर्वसामान्यांसाठी बंद असल्याने प्रवाशांना केवळ एसटी बसचा आधार आहे. कल्याण एसटी बसस्थानकात व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम बसवण्यात आली आहे. त्यामुळे बस कधी येणार, कधी सुटणार, बस नक्की कुठपर्यंत पोहोचली आहे, कुठे अडकली आहे, याची माहिती प्रवाशांना देणे सोपे झाले आहे. त्याचा फायदा प्रवासी आणि प्रशासनाला होत आहे. त्याबरोबर उत्पन्न वाढीसाठी त्याचा उपयोग होणार आहे.

कल्याण एसटी बसस्थानकातून मुरबाड, भिवंडी, टिटवाळा, पडघा, वाडा, पालघर, पनवेल, नवी मुंबई तसेच नगर, नाशिक, पुणे, सोलापूर, बीड, उस्मानाबाद, औरंगाबाद, धुळे आदी भागाकरिता दररोज ७० बस चालविल्या जातात. या बसचे लाइव्ह लोकेशन कळावे, यासाठी व्हेईकल ट्रॅकिंग करणारे एक डिव्हाइस बसविण्यात आले आहे. त्याचा वापर सध्या प्रशासकीय कामकाजासाठी केला जात आहे. तसेच एक स्क्रीन बसस्थानकात लावली असून, त्या आधारे कोणती बस कधी येणार, किती वाजता येणार, याची माहिती प्रवाशांना उपलब्ध करून दिली जात आहे.

----------------------------------

गाडीचा वेग,ठाकठिकाणा कळणार

- एखादी बस पुण्याहून निघाली तर तिचा वेग किती आहे. ती वाहतूक कोंडीत अडकली आहे का. वेग जास्त आहे की, कमी हे, बसस्थानकातील ऑनलाइन ट्रॅकिंग सिस्टीम सॉफ्टवेअरमध्ये प्रशासनाला पाहता येत आहे. त्यामुळे एखादी गाडी ब्रेक डाऊन झाली आहे का. नक्की तेथे पर्यायी व्यवस्था आहे का. याची सगळी माहिती बसस्थानकात उपलब्ध होत आहे. त्यानुसार पुढील कार्यवाही बसस्थानक प्रशासनाकडून केली जात आहे.

- पहाटेपासून ड्युटी लागलेली असते. त्याचे नियोजन आदल्या दिवशी केले जाते. काही वेळेस बसचालक आणि वाहक काही कारणास्तव कामावर हजर राहू शकत नाही. मात्र, तेथे त्यांचे मोबाइल नंबर नमूद केलेले असतात. त्यावेळी एखाद्या अपवादात्मक स्थितीत त्या बसविषयी निश्चित माहिती मिळू शकत नाही.

--------------------------------------------

चालकाच्या निष्काळजीला बसणार चाप

एखाद्या चालकाने विनाकारण एखाद्या ठिकाणी बस जास्त वेळ थांबवली असेल तर त्याची स्थिती ट्रॅकिंग सिस्टीममध्ये लगेच कळणार आहे. ठरवून दिलेल्या गतीपेक्षा जास्त गतीने तो बस चालवित असेल तर त्याचीही माहिती या सिस्टीममध्ये उपलब्ध होणार आहे. त्यात चालक आणि वाहकाचा नंबर असल्याने त्याला संपर्क करून त्याच्या अतिवेगावर नियंत्रण ठेवता येणार आहे.

-------------------------

बसस्थानकात स्क्रीन

- कल्याण बसस्थानकात स्क्रीन लावण्यात आली आहे. त्यावर सतत प्रवाशांना तक्ता दर्शविला जात आहे. त्यामध्ये कोणती गाडी किती वाजता येणार, किती वाजता डेपोत पोहोचणार, याची माहिती दर्शविली जात आहे.

- प्रवाशांच्या सोयीसाठी ही स्क्रीन आता बसस्थानकात लावली असली तरी एसटी महामंडळाकडून एक ॲपही विकसित केले जात आहे. ते प्रत्येक प्रवाशाला मोबाइलमध्ये डाऊनलोड करता येईल. लवकर हे ॲप प्रत्येक प्रवाशांच्या हाती पडणार आहे. हा धोरणात्मक निर्णय असून त्याला थोडा वेळ लागत आहेत.

-------------

ऑनलाइन ट्रॅकिंग सिस्टीम ही प्रशासन आणि प्रवाशांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. त्यामुळे प्रवासी संख्या आणि बस प्रवासातून उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. योग्य माहिती मिळाल्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या सेवेविषयी विश्वास वाढीस लागण्यास मदत होणार आहे.

- विजय गायकवाड, व्यवस्थापक, कल्याण एसटी बसस्थानक.

-----------------

Web Title: Live location of each bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.