पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेमुळे मिळाले दुचाकीस्वाराला जीवनदान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2019 05:04 AM2019-07-14T05:04:05+5:302019-07-14T05:04:14+5:30
कल्याण-बदलापूर रस्त्यावरून दुचाकीने चाललेले राजेंद्र पांढरे (४५) यांना अचानक चक्कर येऊन ते जमिनीवर कोसळले.
ठाणे/ अंबरनाथ : कल्याण-बदलापूर रस्त्यावरून दुचाकीने चाललेले राजेंद्र पांढरे (४५) यांना अचानक चक्कर येऊन ते जमिनीवर कोसळले. त्यावेळी कर्तव्यावर असलेले पोलीस उपनिरीक्षक उल्हास जाधव यांनी बेशुद्ध झालेल्या राजेंद्र यांना हृदयविकारावरील प्राथमिक उपचार देऊन शुद्धीवर आणून जीवनदान दिले.
राजेंद्र यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर छाया रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अंबरनाथ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक उल्हास जाधव हे ११ जुलैच्या रात्री पोलीस वाहनातून पोलीस शिपाई गायकवाड आणि संदीप फडतरे यांच्यासमवेत गस्त घालत होते. कल्याण-बदलापूर रस्त्यावरील एका किराणा दुकानाजवळ राजेंद्र पांढरे यांना दुचाकीवरून जाताना अचानक चक्कर आल्याने ते खाली पडले. यावेळी तेथे असलेल्या उपनिरीक्षक जाधव यांनी पांढरे यांच्या छातीवर काही काळ दाब देऊन त्यांना प्रथम शुद्धीवर आणले आणि त्यानंतर तातडीने इतर सहकाऱ्यांच्या मदतीने रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर, पांढरे यांच्या कुटुंबीयांना त्याबाबतची माहिती दिल्याची माहिती पोलीसांनी दिली.
>प्रशिक्षणाचा झाला फायदा
राजेंद्र पांढरे दुचाकीवरून जाताना त्यांना अचानक चक्कर येऊन ते खाली पडले. ते पाहून उपनिरीक्षक जाधव यांना पाढरेंना हृदयविकाराचा झटका आला असावा, असे वाटले. त्यांनी हृदयविकारावरील प्राथमिक उपचाराचे प्रशिक्षण घेतले असल्याने पांढरे यांच्या छातीवर काही काळ दाब देऊन त्यांना प्रथम शुद्धीवर आणले.
प्रसंगावधान दाखवल्याने कौतुक
प्रसंगावधान राखून या दाखवलेल्या कामगिरीबद्दल उपनिरीक्षक जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अंबरनाथ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील घुगे आदींनी अभिनंदन केले आहे.