तरणतलावाच्या आजीव सदस्यांची होतेय गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 11:52 PM2019-06-04T23:52:14+5:302019-06-04T23:52:21+5:30
डोंबिवली क्रीडासंकुल : सोयी-सुविधांची वानवा, केडीएमसी प्रशासनाचे दुर्लक्ष
कल्याण : डोंबिवली क्रीडासंकुलातील तरणतलावाच्या सुविधेच्या आजीव सदस्यांची गैरसोय होत आहे. तलावात पोहण्यासाठी अन्य लोकांना सोडले जात असल्याने सदस्यांना या आनंदापासून दूर राहावे लागत आहे. या समस्येबाबत महापालिका मुख्यालयाने लक्ष वेधले आहे; मात्र त्याकडे प्रशासनाकडून डोळेझाक केली जात असल्याचा आरोप आजीव सदस्य संघटनेचे अध्यक्ष हेमंत वैद्य यांनी केला आहे.
डोंबिवली सावळाराम क्रीडा संकुलात महापालिकेने आंतरराष्ट्रीय दर्जाचा तरणतलाव उभारलेला आहे. हा तरणतलाव काही वर्षे कंत्राटदाराकडे दिला होता. त्याच्याकडून देखभाल-दुरुस्ती केली जात नसल्याने त्याचा ठेका रद्द करण्यात आला. त्यानंतर दुसरा कंत्राटदार नेमण्यात आला. या तरणतलावाचे २०११ मध्ये ५५० जणांनी आजीव सदस्यत्व स्वीकारले. त्यासाठी प्रत्येकी २५ हजार रुपये शुल्क भरले आहे. त्यांना क्रीडासंकुलातील सोयी-सुविधा व लाभ मिळणे आवश्यक आहे. या तरणतलावात अन्य मुले व व्यक्तींना पैसे घेऊन पोहण्यासाठी सोडले जाते.
तरणतलावाचा लाभ आजीव सदस्यांना मिळत नाही. तेथे गर्दी दिसून येते. तरणतलावातील लॉकर रूम, पोहून झाल्यावर अंघोळीसाठी असलेल्या वॉशरूममधील शॉवर तुटलेले आहेत. शौचालयाची दुरवस्था झाली असून स्वच्छताही नाही. तसेच ट्यूबलाइटही लागत नाहीत, याकडे अध्यक्ष वैद्य यांनी लक्ष वेधले आहे.
क्रीडासंकुलाबाहेर मोकळे मैदान असून तेथे जॉगिंग ट्रॅक आहे. या ट्रॅकवर रात्री काही मुले बाइकवरून रेसिंग करतात. तसेच, मैदानात असलेल्या प्रेक्षागॅलरीत रात्री अनेक तरुण मद्यपान करतात. याविरोधातही वैद्य यांनी आवाज उठवला आहे. सेवा-सुविधा नाहीत, देखभाल-दुरुस्ती होत नसल्याबाबत २०१५ पासून वैद्य पाठपुरावा करीत आहे. त्याची प्रशासन योग्यप्रकारे दखल घेत नसल्याचा आरोप वैद्य यांनी
केला आहे.
देखभाल-दुरुस्तीबाबत उपअभियंत्याने आरोप फेटाळले
क्रीडासंकुलाची देखभाल-दुरुस्तीचे कामकाज पाहणारे उपअभियंता सचिन मळेकर यांनी वैद्य यांचे आरोप फेटाळले आहेत.
मळेकर म्हणाले की, वेळोवेळी दुरुस्ती देखभाल केली जाते. दोन महिने क्रीडासंकुलात लोकसभा निवडणुकीचे कामकाज केले जात होते. तरणतलावाच्या कार्यालयाचा ताबाच निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतला होता. २३ मे रोजी मोजणी झाल्यावर संकुल महापालिकेच्या ताब्यात आले. त्यामुळे तेथे अस्वच्छता झाली असावी.
तरण तलावात उन्हाळी शिबिरानिमित्त मुलांना पोहण्यासाठी सोडल्यास त्याचा अर्थ अन्य लोकांना सोडले असा होत नाही. तरण तलवाबाहेर क्रीडा संकुलातील जॉगिंग ट्र्क व प्रेक्षा गॅलरीच्या सुरक्षिततेचा विषय सुरक्षारक्षकांचा आहे.