ठाण्यातील पालिकांवर मेट्रोने टाकला ५६२ कोटींचा भार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2019 05:30 AM2019-08-11T05:30:19+5:302019-08-11T05:30:33+5:30
आपल्या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित मेट्रो प्रकल्पांतील स्थानकांच्या परिसरांत उभारण्यात मल्टिमोडल इंटिग्रेटेड अर्थात बहूवाहतूक परिवहन प्रकल्पाच्या उभारणीतील खर्चाचा ५० टक्के भार हा त्यात्या महापालिकांच्या शिरावर एमएमआरडीएने टाकला आहे.
- नारायण जाधव
ठाणे : आपल्या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित मेट्रो प्रकल्पांतील स्थानकांच्या परिसरांत उभारण्यात मल्टिमोडल इंटिग्रेटेड अर्थात बहूवाहतूक परिवहन प्रकल्पाच्या उभारणीतील खर्चाचा ५० टक्के भार हा त्यात्या महापालिकांच्या शिरावर एमएमआरडीएने टाकला आहे. यामुळे मुंबई महापालिका वगळता ठाणे, भिवंडी, मीरा-भार्इंदर, कल्याण-डोंबिवलीसह पनवेल या पालिकांवर ६१२ कोटी ५० लाखांचा बोजा पडणार आहे. उर्वरित २८५० कोटी ७२ लाखांचा भार मुंबई महापालिकेस सहन करावा लागणार आहे.
मुंबई वगळता इतर महापालिका आर्थिकदृष्ट्या खंगलेल्या असल्याने त्या हा भार कितपत सहन करतात, हा प्रश्न आहे. एमएमआरडीएच्या १२ मेट्रो प्रकल्पांत १५५ स्थानके असून यातील बहूवाहतूक परिवहन प्रकल्पांचा खर्च हा प्रत्येक स्थानकासाठी २५ कोटी रुपये असून त्यातील साडेबारा कोटी रुपयांचा भार त्यात्या ठिकाणच्या पालिकांनी उचलावा, असा निर्णय एमएमआरडीएच्या १४८ व्या बैठकीत घेण्यात आला आहे.
भिवंडी मनपावर ७५ कोटींचा बोजा
अशाच प्रकारे ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो-५ च्या मार्गातील एकूण स्थानकांपैकी अंजूरफाटा, धामणकरनाका, भिवंडी, गोपालनगर, टेमघर आणि राजनोलीनाका ही सहा मेट्रो स्थानके भिवंडी महापालिका हद्दीत येतात. त्यांच्या परिसरातील बहूवाहतूक परिवहन प्रकल्पासाठी दीडशे कोटी खर्च अपेक्षित असून त्यातील निम्मा अर्थात ७५ कोटींचा भार भिवंडी महापालिकेस सहन करावा लागणार आहे.
मीरा-भार्इंदर महापालिकेवर १३७.५० कोटींचा भार
मीरा-भार्इंदर महापालिका हद्दीत गायमुख ते काशिमीरा आणि दहिसर ते भार्इंदर असे दोन प्रस्तावित मार्ग आहेत. यातील गायमुख ते काशिमीरा या मार्गावर चेणे, वरसावे, लक्ष्मीबाग आणि शिवाजी चौक ही चार स्थानके, तर दहिसर ते भार्इंदर या मार्गावर पांडुरंगवाडी, मीरागाव, काशीगाव, साईबाबानगर, मेडतियानगर, शहीद भगतसिंग उद्यान आणि नेताजी बोस मैदान ही सात अशी ११ स्थानके बांधण्यात येणार असून त्यांच्या हद्दीतील बहूवाहतूक परिवहन प्रकल्पासाठीच्या २७५ कोटींपैकी १३७ कोटी ५० लाखांचा भार हा मीरा-भार्इंदर महापालिकेवर पडणार आहे.
केडीएमसीवर १८७ कोटी ५० लाखांचा बोजा
खंगलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतूनही दोन मेट्रो जाणार आहेत. यात ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो-५ च्या मार्गातील दुर्गाडी, सहजानंद चौक, कल्याण रेल्वेस्थानक आणि कल्याण एपीएमसी ही चार स्थानके, तर कल्याण-तळोजा मार्गातील गणेशनगर, पिसवली, गोळवली, डोेंबिवली, एमआयडीसी, सागाव, सोनारपाडा, मानपाडा, हेदुटणे, कोळेगाव, निळजे अशी १५ स्थानके आहेत. या स्थानकांच्या परिसरांतील बहूवाहतूक परिवहन प्रकल्पांच्या उभारणीसाठी प्रत्येकी २५ कोटी याप्रमाणे सर्व १५ स्थानके मिळून ३७५ कोटी खर्च अपेक्षित असून त्यातील ५० टक्के अर्थात १८७ कोटी ५० लाख रुपयांचा बोजा कल्याण-डोंबिवली पालिकेस सहन करावा लागणार आहे.
बहुवाहतूक परिवहन प्रकल्पात मिळणार १७ सुविधा
आपले घर किंवा कार्यालय ते मेट्रो स्थानकादरम्यानचा प्रवास सुकर व जलदगतीने व्हावा, अशा प्रकल्पाचा मुख्य हेतूने स्थानकांच्या ५०० मीटर त्रिज्येच्या वर्तुळात पादचारी मार्ग रु ंदीकरण व सायकल ट्रॅक, वाहतूक व चौक सुधारणा, रहदारी सिग्नल, जमिनीवरील व तिच्या खालील सुविधांची पुनर्रचना, पार्किंग, रस्त्यावरील पार्किंगला प्रतिबंध, रस्त्यावरील दिवाबत्ती, बस-वे ची पुनर्रचना, खाजगी वाहनांमार्फत पिकअप व ड्रॉपसेवा, मेट्रो स्थानकापर्यंत येजा करणाऱ्या बस तसेच विजेवर चालणारी वाहने, दिशादर्शक तसेच माहितीफलक, सीसीटीव्ही, पादचारी पूल, स्कायवॉक, रस्त्यालगत बसण्यासाठी बाकडी, पाणपोई, सार्वजनिक सायकलथांबे, अशा १७ सुविधांचा या उपक्र मात समावेश आहे.
ठाणे महापालिकेवर १६२.५० कोटींचा भार
वडाळा-कासारवडवली मार्गावर तीनहातनाका, आरटीओ जंक्शन, महापालिका मार्ग, कॅडबरी जंक्शन, माजिवडा, कापूरबावडी, मानपाडा, टिकुजिनीवाडी, डोंगरीपाडा, विजय गार्डन, कासारवडवली ही ११ स्थानके, तर गायमुख-मीरा रोड मार्गावरील गायमुख हे एक आणि कासारवडवली ते भिवंडी-कल्याण मार्गावरील बाळकुमनाका अशी १३ स्थानके आहेत. त्यांच्या परिसरातील बहूवाहतूक परिवहन प्रकल्पासाठी ३३५ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून त्यातील १६२ कोटी ५० लाख रुपयांचा भार ठाणे पालिकेवर येणार आहे.
पनवेल महापालिकेवर
५० कोटींचा भार
नव्याने उदयास आलेल्या पनवेल महापालिकेच्या हद्दीत कल्याण-तळोजा मार्गातील तुर्भे, पिसवे डेपो, पिसवे आणि तळोजा ही चार मेट्रो स्थानके प्रस्तावित आहेत. त्यांच्या हद्दीतील बहूवाहतूक परिवहन प्रकल्पांच्या उभारणीसाठी प्रत्येकी २५ कोटी याप्रमाणे चार स्थानकांसाठी १०० कोटी असून त्यातील निम्मा अर्थात ५० कोटींचा भार पनवेल महापालिकेस सहन करावा लागणार आहे.