घणसोली स्थानकात लोकलचे डबे अनकपल, ट्रान्सहार्बरचा खोळंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 06:02 PM2017-10-24T18:02:51+5:302017-10-24T18:52:06+5:30
ट्रान्सहार्बरमार्गे ठाण्याहून पनवेलला जाणा-या लोकल अनकपल झाल्याने डबे एकमेकांपासून वेगळे झाल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी ४ वाजून १६ मिनिटांनी घणसोली स्थानकात घडली.
डोंबिवली: ट्रान्सहार्बरमार्गे ठाण्याहून पनवेलला जाणा-या लोकल अनकपल झाल्याने डबे एकमेकांपासून वेगळे झाल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी ४ वाजून १६ मिनिटांनी घणसोली स्थानकात घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण या घटनेमुळे सव्वातास ट्रान्सहार्बरच्या डाऊन मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
ठाणे स्थानकातून संध्याकाळी ४ वाजण्याच्या सुमारास पनवेलच्या दिशेने निघालेली लोकल घणसोली स्थानकात ४.१४ च्या सुमारास पोहोचली. तेथून निघतांना हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले. लोकलचे डबे एकमेकांपासून वेगळे झाल्याचे बघणयासाठी प्रवाशांनी एकच गर्दी केली होती. स्थानकातच ही घटना घडल्याने लोकल तातडीने रिकामी करण्यात आली. रेल्वे प्रशासनाच्या तांत्रिक दुरुस्ति विभागाच्या कर्मचा-यांनी घटनास्थळी धाव घेत डबे जोडण्यासाठी प्रयत्न केले. अखेरीस सव्वातासाने संध्याकाळी ५ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास ही लोकल पनवेलच्या दिशेने पुढे धावल्याची माहिती कोपरखैरणे, ठाणे लोहमार्ग पोलिसांनी दिली. हा अपघात नेमका कशामुळे झाला याबाबतची माहिती घेण्यासाठी मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनिल उदासी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी लोकल अनकपल झाल्याने हा अपघात घडल्याचे सांगितले . त्यानंतर ठाणे स्थानकातून वाशीकडे जाणा-या लोकल हळुहळु पुढे धावल्या. पण तोपर्यंत ट्रान्सहार्बरचे वेळापत्रक सपशेल कोलमडले होते. त्याचा फटका संध्याकाळी घरी परतणा-या लाखो चाकरमान्यांना बसला.