मीरारोड वासियांचा रेल्वे प्रवास जीवघेणा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2018 10:36 PM2018-09-09T22:36:31+5:302018-09-09T22:36:49+5:30
मीरारोड ते दहिसर रेल्वे स्थानका दरम्यान गेल्या दहा वर्षांत लोकल मधून पडून ५१ प्रवाश्यांचा मृत्यू झाला असून ५४ जणं जखमी झाल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी माहिती अधिकारात दिली आहे .
मीरा रोड - मीरारोड ते दहिसर रेल्वे स्थानका दरम्यान गेल्या दहा वर्षांत लोकल मधून पडून ५१ प्रवाश्यांचा मृत्यू झाला असून ५४ जणं जखमी झाल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी माहिती अधिकारात दिली आहे . गर्दीच्यावेळात चर्चगेट कडे जाणाऱ्या लोकल आधीच विरार - भाईंदर वरून खच्चून भरलेल्या असल्याने मीरारोडवासीयांना लोकल पकडताना अक्षरशः लोंबकळत प्रवास करावा लागतो . मीरारोडवासीयांचा प्रवास जीवघेणा बनला आहे .
मीरारोड शहराची लोकवस्ती सध्या पूर्व भागातच झपाट्याने वाढत आहे . याच लोकवस्तीतल्या सध्याच्या प्रवाशांचा ताण लोकल सेवेला झेपेनासा झाला आहे . पूर्व भागात अजूनही काही लाखांनी लोकवस्ती वाढणार असून पश्चिमेला लोकवस्ती झाली तर प्रवाश्यांची संख्या दुपटीने वाढणार आहे .
मीरारोडवासीयांना नोकरी , शिक्षण , उद्योग वा अन्य कारणांनी मुंबई शिवाय पर्याय नाही. मुळात मुंबईत घर परवडत नसल्याने लोकं मुंबईला खेटून असणाऱ्या मीरारोड वा भाईंदरचा पर्याय निवडतात . त्यातही रस्त्याने जायचे म्हटले तर जागोजागी प्रचंड वाहतूक कोंडी मुळे वेळ व पैसे वाचवण्यासाठी लोकल शिवाय दुसरा आधार राहिलेला नाही .
त्यामुळे मीरारोड रेल्वे स्थानकातून रोजच्या प्रवाश्यांची संख्या सुमारे १ लाख १४ हजारच्या घरात आहे . मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाश्यांची संख्या सकाळी तर प्रचंड आहेच पण दुपारी व सायंकाळी देखील गर्दी असते .
सकाळ ते दुपार दरम्यान डहाणू , विरार , भाईंदर येथून येणाऱ्या लोकल आधीच गर्दीने तुडुंब भरलेल्या असतात . त्यामुळे मीरारोड स्थानकातून लोकल मध्ये पाय ठेवणे म्हणजे दिव्यच असते . आत मध्ये तर मुंगीला शिरायला देखील वाव नसतो .
त्यातच दरवाजे अडवून बसणाऱ्या प्रवाश्यांच्या दादागिरी मुळे सुद्धा चढण्यासाठी त्रास व वाद होत असतो . दरवाजा अडवून असणारे तर आत मध्ये जाऊ सुद्धा देत नाहीत . शेवटी लोकल पकडायची म्हणजे लटकून जाण्या शिवाय दुसरा पर्यायच हाती नसतो . विरारला राहणारे शिवसेनेचे माजी नगरसेवक राजकुमार चोरघे हे मीरारोड मध्ये कामा निमित्त येत असतात . त्यांनी मीरारोडवासियांची लोकल पकडण्यासाठी चाललेली जीवघेणी कसरत पाहून वसई रेल्वे पोलिसां कडे माहिती अधिकार टाकून गेल्या दहा वर्षात मीरारोड ते दहिसर रेल्वे स्थानक दरम्यान लोकल मधुनच पडून वा लोकल अपघातात मरण पावलेले व जखमी झालेले यांची आकडेवारी मागितली होती .
रेल्वे पोलिसांनी २००८ साला पासून २०१७ पर्यंतची आकडेवारी दिली असून गेल्या १० वर्षात ५१ प्रवाश्याना आपले जीव गमवावे लागले . तर ५४ प्रवाशी जखमी झाले आहेत अशी माहिती दिली आहे . ५४ प्रवाश्यां पैकी बहुतांशी ना कायमचे अपंगत्व आले आहे . मीरारोड साठी गर्दीच्या वेळात स्वतंत्र लोकल सोडावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षां पासून प्रवाशी करत आहेत . परंतु रेल्वे प्रशासना कडून मात्र या कडे सातत्याने तांत्रिक कारणं पुढे करून प्रवाश्यांच्या जीवाशी खेळ चालवल्याचा आरोप चोरघे यांनी केला आहे . रेल्वे प्रशासनाने तातडीने मीरारोड च्या प्रवाश्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे .