डायघर कचरा प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध; १ सप्टेंबर पासून डायघर येथे कचरा प्रकल्प सुरु करणार

By अजित मांडके | Updated: August 16, 2023 15:58 IST2023-08-16T15:57:58+5:302023-08-16T15:58:13+5:30

स्थानिकांनी येथील प्रकल्पाला कडाडून विरोध केला आहे.

Local opposition to Daighar waste project | डायघर कचरा प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध; १ सप्टेंबर पासून डायघर येथे कचरा प्रकल्प सुरु करणार

डायघर कचरा प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध; १ सप्टेंबर पासून डायघर येथे कचरा प्रकल्प सुरु करणार

ठाणे : भंडार्ली येथे तात्पुरत्या स्वरुपात सुरु करण्यात आलेल्या कचरा प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध केल्यानंतर आता १ सप्टेंबर पासून महापालिका डायघर येथे कचरा प्रकल्प सुरु करणार आहे. परंतु हा प्रकल्प देखील अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्थानिकांनी येथील प्रकल्पाला कडाडून विरोध केला आहे. मागील कित्येक वर्षात येथील गावांना मुलभुत सोई सुविधा देण्यात आलेल्या नसतांना आता कचरा आमच्या दारी कशासाठी असा सवाल करीत येथील रहिवाशांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे.

ठाणे शहरात आजच्या घडीला १ हजार मेट्रीक टन कचरा निर्माण होत आहे. हा कचरा सुरवातीला दिवा येथे टाकला जात होता. मात्र येथील कचरा प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध केला होता. त्यानंतरही मागील कित्येक वर्षे हा प्रकल्प येथे सुरु होता. अखेर दिड वर्षापूर्वी येथील कचरा प्रकल्प बंद करण्यात आला. त्यानंतर डायघर येथे कचरा प्रकल्प सुरु करण्याचा मानस पालिकेचा होता.

मागील २००८ पासून याठिकाणी प्रकल्प सुरु करण्यासाठी महापालिकेची तयारी होती. परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे तसेच स्थानिकांचा झालेला टोकाचा विरोध यामुळे हा प्रकल्प सुरु करता आला नव्हता. त्यामुळे दिवा येथील डंम्पीग बंद केल्यानंतर पालिकेने तात्पुरत्या स्वरुपात भंडार्ली येथे कचरा प्रकल्प सुरु केला होता. परंतु ऐन पावसाळ्यात येथील रहिवाशांनी या प्रकल्पाला विरोध केला. शेतीचे होणारे नुकसान, विविध आजारांचे वाढते प्रमाण यामुळे हा प्रकल्प तत्काळ बंद करण्याची मागणी करीत स्थानिकांनी आंदोलन केले होते. तसेच या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील त्यांनी भेट घेतली होती.

दरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांनी हा प्रकल्प ३१ आॅगस्ट नंतर बंद होणार असल्याचे स्पष्ट केले. तर डायघर येथील पालिकेच्या जागेवर कचरा प्रकल्प सुरु केला जाईल असेही स्पष्ट झाले होते. त्यानुसार डायघर येथे कचºयापासून वीज निर्मितीचा प्रकल्प सुरु करण्यचा पालिकेचा मानस आहे. याठिकाणी त्यासाठी मशनरी देखील आल्याचे पालिकेने सांगितले आहे. परंतु आता या कचरा प्रकल्पाला देखील स्थानिकांनी पुन्हा विरोध करण्यास सुरवात केली आहे. १५ आॅगस्टच्या दिवशी येथील काही गावकºयांनी दत्त मंदिरात बैठक घेऊन या प्रकल्पाला विरोध केला आहे.  या बैठकीत पंचक्रोशी संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली असून काही झाले तरी कचरा प्रकल्प होऊ देणार नसल्याचा इशारा येथील रहिवाशांनी दिला आहे.

येथील देसाई शिळ, डायघर, पडले, देसाई, खिडकाली या ग्रामस्थांनी प्रत्येक गावा-गावात मिटिंग घेऊन विरोध करण्याचे ठरवले आहे.  भारतीय स्वातंत्र्य दिनी डायघर गाव येथील दत्त मंदिरात झालेल्या बैठकीत डायघर डंपिंगला विरोध करण्यात आला. मुलभुत सोई सुविधा अद्यापही आम्हाला मिळालेल्या नाहीत, साधा डायघर गावासाठी रस्ता देखील नाही, गटार, पायवाटांचा अभाव आहे, असे असतांना कचरा प्रकल्पामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे आम्ही हा प्रकल्प होऊ देणार नसल्याचा इशारा पंचक्रोशी संघर्ष समितीचे पदाधिकारी जितेंद्र पावशे यांनी दिला आहे.

Web Title: Local opposition to Daighar waste project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.