"अगली बार बुलेट तुम्हारे सिर में होगी"; ठाण्यात सत्ताधारी पक्षाच्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2024 03:43 PM2024-10-03T15:43:19+5:302024-10-03T15:59:52+5:30

ठाण्यात सत्ताधारी पक्षाच्या राजकीय नेत्याला जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर खळबळ उडाली आहे.

Local politician in Thane has received a parcel containing a bullet and a letter threatening to kill him | "अगली बार बुलेट तुम्हारे सिर में होगी"; ठाण्यात सत्ताधारी पक्षाच्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी

"अगली बार बुलेट तुम्हारे सिर में होगी"; ठाण्यात सत्ताधारी पक्षाच्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी

Thane Crime : ठाण्यातून एक खळबळ उडवून देणारी घटना समोर आली आहे. ठाण्यात एका सत्ताधारी राजकीय पक्षाच्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एका पार्सलमधून ही धमकी देण्यात आली आहे. तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा शोध सुरु केला आहे. या पार्सलमध्ये एक गोळी आणि जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र होते, असे राजकीय नेत्याने फिर्यादीत म्हटलं आहे. या धमकीच्या पार्सलमुळे ठाण्याच्या राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरु झाली आहे.

ठाण्यातील सत्ताधारी राजकीय पक्षाच्या नेत्याला मिळालेल्या पार्सलमुळे खळबळ उडाली आहे. पार्सल उघडताच राजकीय नेत्याला जबर धक्का बसला. पार्सलमध्ये काडतुसांसह धमकीचे पत्र होते. वागळे इस्टेट येथील राजकीय नेत्याच्या जनसंपर्क कार्यालयात हे पार्सल देण्यात आले होते. पार्सलमध्ये काडतूस आणि जीवे मारण्याची धमकीची चिठ्ठी सापडली. या प्रकरणाची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पार्सल कोणी पाठवले हे अद्याप समजू शकलेले नाही.

पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, पार्सल उघडले असता त्यात पेन्सिल शार्पनरचा बॉक्स होता. बॉक्सच्या आत कापडाच्या दोन तुकड्यांमध्ये गुंडाळलेले काडतूस होते. यासोबतच हिंदीत लिहिलेली धमकीची चिठ्ठीही होती. त्यात," इस बार बुलेट को तुम्हारे हाथ में रख रहा हूं, अगली बार तुम्हारे सिर में होगी. यह सिर्फ छोटा सा तोहफा है, अगली बार बड़ा होगा," असा धमकीचा मजकूर लिहीला होता.

या घटनेनंतर राजकीय नेत्याने तत्काळ पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणी  वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल झाल्यानंतर तपास सुरू करण्यात आला आहे. पार्सल पाठवणाऱ्या व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून, पोलीस संशयितांचा शोध घेत आहेत. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, पत्र पाठवणाऱ्या व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही मात्र लवकरच त्याचा शोध घेतला जाईल.

दरम्यान, अशा घटना सुरक्षा व्यवस्थेसमोरील आव्हान असल्याचे लोकांचे म्हणणं आहे. स्थानिक नेत्याला मिळालेल्या धमकीनंतर पोलीस सुरक्षा पुरवण्याचा विचार करत आहेत. पार्सल पाठवणाऱ्याची ओळख पटवण्यासाठी पोलीस जवळपासचे सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक बाबी तपासत आहेत. स्थानिक नेत्याला मिळालेल्या या धमकीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. लवकरच या प्रकरणाच्या मुळापर्यंत पोहोचून आरोपीला अटक करण्यात येईल, असे पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
 

Web Title: Local politician in Thane has received a parcel containing a bullet and a letter threatening to kill him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.