रेल्वे दुर्गांनी आणली ‘जीवनवाहिनी’त जान, महिला प्रवाशांची लगबग वाढली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2020 10:09 AM2020-10-22T10:09:26+5:302020-10-22T10:09:41+5:30
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना राज्य सरकार व रेल्वेनी सर्वप्रथम प्रवासाची मुभा दिल्याने डॉक्टर, परिचारिका, सरकारी महिला कर्मचारी आदींना प्रवासाची परवानगी होती. मात्र त्याची संख्या एकूण लक्षावधी प्रवाशांच्या तुलनेत मर्यादीत होती.
डोंबिवली : मुंबईच्या जीवनवाहिनीला लटकून प्रवास करणाऱ्या ‘दुर्गां’ना तब्बल सात महिन्यांनंतर ऐन नवरात्रात रेल्वे प्रवासाची अनुमती मिळाल्याने बुधवारी रेल्वेस्थानकावरील तिकीट खिडक्यांवर आणि फलाटावर महिलांची लगबग दिसली. महिला लोकलची संख्या वाढवण्याची मागणी करणाऱ्या महिलांनाच फक्त प्रवासाची मुभा असल्याने पुरुषांच्या मोकळ्या डब्यातूनही काही महिलांनी प्रवास केला. मात्र सकाळी ११ नंतर आणि सायंकाळी सात नंतर प्रवासाची असलेली बंधने अन्यायकारक असल्याची तक्रार अनेक महिला प्रवाशांनी केली.
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना राज्य सरकार व रेल्वेनी सर्वप्रथम प्रवासाची मुभा दिल्याने डॉक्टर, परिचारिका, सरकारी महिला कर्मचारी आदींना प्रवासाची परवानगी होती. मात्र त्याची संख्या एकूण लक्षावधी प्रवाशांच्या तुलनेत मर्यादीत होती. मात्र आता सरसकट सर्व महिलांना रेल्वे प्रवासाची परवानगी दिली गेल्याने खासगी क्षेत्रातील काही महिला कर्मचाऱ्यांचा अत्यंत कंटाळवाणा, त्रासदायक बस प्रवास संपला आहे. तो आनंद आणि रेल्वे प्रवासातील मैत्रिणी भेटल्याचा आनंद यामुळे महिलांच्या डब्यात सोशल डिस्टन्सिंग राखूनही प्रवासाचा आनंद घेताना महिला, मुली बुधवारी, पहिल्या दिवशी दिसत होत्या. नवरात्रीत वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या रंगाच्या साड्या, ड्रेस परिधान करण्याची प्रथा असल्याने बुधवारी निळ्या रंगाची निळाई डब्याडब्यात दिसत होती. रेल्वे डब्यात सेल्फी घेण्यात येत होते, ग्रुप फोटोही काढले जात होते.
गुलाबपुष्प देऊन महिलांचे केले स्वागत
डोंबिवली पश्चिमेतील रेल्वे तिकीट खिडकीपाशी सकाळी ११ नंतर महिलांनी गर्दी केली होती. सकाळी ११ ते १२ पर्यंत ही गर्दी होती. पहिला दिवस असल्याने कमी गर्दी होती, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. महिलांंनी सांगितले की, गेल्या सात महिन्यांत कामाच्या ठिकाणी वेळेवर पोहोचण्याकरिता सकाळी पाण्याच्या वेळात झटपट काम करण्याची सवय सुटली आहे. इतके दिवस घरी असल्याने हळूहळू कामे करण्याची सवय लागली होती. मात्र, यापुढे ही सवय झटकून पटापट निघावे लागेल, असे मत महिलांनी व्यक्त केले.
अंबरनाथ, बदलापूर व अन्य काही रेल्वेस्थानकांवर महिलांचे गुलाब देऊन स्वागत करण्यात आले. घरकाम करणाऱ्या काही महिला या आंबिवली, शहाड, विठ्ठलवाडी भागातून डोंबिवलीत येतात. नवी मुंबई, ठाणे, कुर्ला तसेच पश्चिम रेल्वेने त्या भागात जाणाऱ्या आणि कल्याण, डोंबिवली येथून जाणाऱ्या काही महिलांनी सकाळची रेल्वेची वेळ प्रवासाला योग्य असल्याचे म्हटले. मात्र काही महिलांनी एक-दीडच्या सुमारास कामावर पोहोचणाऱ्या महिला रात्री कामावरून सुटणार कधी आणि परत येताना सहप्रवासी नसल्यास सुरक्षेचे काय, असे सवाल उपस्थित केले.
वेळेच्या बंधनावर नाराजी
महिलांना रेल्वे प्रवासाकरिता सकाळी ११ ते दुपारी ३ तसेच संध्याकाळी ७ वाजल्यानंतर मुभा दिली. परंतु, अनेक महिलांची कार्यालयीन वेळ ही ११ किंवा त्या अगोदरची असल्याने त्यांना या निर्णयाचा लाभ होत नाही. महिलांना सेकंड शिफ्टकरिता या अनुमतीचा लाभ होणार आहे. सकाळी ८ ते ८.३० वाजता सर्व महिला प्रवाशांना लोकल प्रवासाची परवानगी द्यावी, अशी मागणी महिला प्रवाशांनी केली. महिला प्रवाशांना परवानगी देताना कामाच्या वेळा बदलण्याची चर्चा राज्य सरकार व रेल्वे प्रशासनाने केली होती. मात्र वेळेच्या मर्यादा जाहीर केल्याने अनेक महिलांना या परवानगीचा लाभ होणार नाही.
सामान्य महिला रेल्वे प्रवाशांना प्रवासाची परवानगी देण्याकरिता बुधवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत प्रवासाची वेळ बदलावी, अशी मागणी उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्थेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी केली होती. परंतु, आणखी काही काळ थांबा, आठवड्यानंतर बघू, असे उत्तर राज्य शासनाच्या आपत्कालीन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली होती. त्यामुळे येत्या पंधरवड्यात महिलांचा प्रतिसाद पाहून प्रवासाच्या वेळेबाबत निर्णय होईल.
- ॲॅड. आदेश भगत, अध्यक्ष, दिवा रेल्वे प्रवासी संघटना
महिलांकरिता रेल्वे प्रवासाची सरसकट मुभा मिळाली ही नक्कीच आनंदाची गोष्ट आहे. मात्र अकरानंतर प्रवासाची अट अनेक महिलांना त्रासदायक असून त्यामुळे अनेक महिला प्रवाशांची रस्ते मार्गे सध्या सुरु असलेल्या खडतर प्रवासातून तूर्त सुटका होणार नाही.
-सायली जोशी, नोकरदार
महिलांना रेल्वे प्रवासाची परवानगी दिली हे चांगले आहे. तसेच वेळेचे बंधन घातल्याने विनाकारण कुणीही महिला, मुली प्रवास करायला बाहेर पडणार नाहीत. शिफ्ट ड्युटी करणाऱ्यांना ही वेळ सोयीची आहे.
- शलाका सावंत, नोकरदार