गस्ती पथके रोखणार लोकलवरील दगडफेक;लोहमार्ग पोलीस घेणार स्थानिक पोलिसांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 01:18 AM2018-10-07T01:18:37+5:302018-10-07T01:18:59+5:30
मुंब्रा-दिवादरम्यान गुरुवारी रात्री वेगवेगळ्या तीन लोकलवर झालेल्या दगडफेकीच्या घटनांत तीन महिला प्रवासी जखमी झाल्याने ठाणे लोहमार्ग पोलिसांनी आरपीएफ पोलीस तैनात केले आहेत.
ठाणे : मुंब्रा-दिवादरम्यान गुरुवारी रात्री वेगवेगळ्या तीन लोकलवर झालेल्या दगडफेकीच्या घटनांत तीन महिला प्रवासी जखमी झाल्याने ठाणे लोहमार्ग पोलिसांनी आरपीएफ पोलीस तैनात केले आहेत. भविष्यात अशा घटना घडू नये, यासाठी ठाणे शहर पोलिसांबरोबर आरपीएफची मदत घेणार असल्याचे लोहमार्ग पोलिसांनी सांगितले.
गुरुवारी रात्री बदलापूर, डोंबिवली आणि कल्याण या तीन लोकलवर अनोळखी व्यक्तींकडून दगड फेकण्यात आले. यामध्ये तीन महिला जखमी झाल्या असून त्यातील एका घटनेत डोंबिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून
तो ठाणे लोहमार्ग पोलिसांकडे
वर्ग करण्यात आला आहे.
याचदरम्यान, दिवा आरपीएफ पोलिसांनी दिवा रेल्वेस्थानक ते मुंब्रा खाडीकिनाऱ्यापर्यंत पेट्रोलिंग सुरू केले आहे. तर, ठाणे लोहमार्ग पोलिसांनी गस्त वाढवली असून दगड फेकणाºयांचा शोध घेण्यासाठी ठाणे शहर पोलीस आणि आरपीएफ यांची मदत घेणार असल्याची माहिती ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरतोडे यांनी ‘लोकमत’ला दिली.
दगडफेकीच्या वर्षभरात सात घटना मार्च महिन्यात पारसिक
बोगद्याजवळ दगडफेकीच्या तीन घटना घडल्या होत्या. त्यामध्ये तीन महिला जखमी झाल्या होत्या. त्यानंतर, गेल्या महिन्यात दिव्यात लोकलवर भिरकावलेल्या एका दगडाने एक महिला जखमी होती. तसेच गुरुवारी रात्री अर्ध्या तासाच्या अंतराने लोकलवरील दगडफेकीच्या घडलेल्या तीन घटनांमध्ये पुन्हा तीन महिला जखमी झाल्या आहेत. अशा प्रकारे वर्षभरात एकूण सात घटना घडल्या असून त्यामध्ये प्रामुख्याने महिलांना टार्गेट केल्याचे दिसत
आहे.