वीज पुरवठा खंडित करण्यासाठी गेलेल्या टोरंट पावरच्या कर्मचाऱ्यांना स्थानिकांची मारहाण; एका कर्मचाऱ्याचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2021 08:13 PM2021-07-03T20:13:52+5:302021-07-03T20:17:19+5:30

Bhiwandi News : धक्काबुक्की तसेच मारहाणीत टोरंट पावरच्या सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी काटई खाडीपार परिसरातील घरत कंपाउंड येथे घडली आहे.

Locals beat Torrent Power employees who went to cut off power supply; Death of an employee | वीज पुरवठा खंडित करण्यासाठी गेलेल्या टोरंट पावरच्या कर्मचाऱ्यांना स्थानिकांची मारहाण; एका कर्मचाऱ्याचा मृत्यू 

वीज पुरवठा खंडित करण्यासाठी गेलेल्या टोरंट पावरच्या कर्मचाऱ्यांना स्थानिकांची मारहाण; एका कर्मचाऱ्याचा मृत्यू 

Next

भिवंडी - थकीत वीज बिल तसेच अवैध वीज कनेक्शन यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या टोरंट पावरच्या कर्मचाऱ्यांना स्थानिक नागरिकांनी विरोध केल्यानंतर झालेल्या शिवीगाळ व धक्काबुक्की तसेच मारहाणीत टोरंट पावरच्या सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी काटई खाडीपार परिसरातील घरत कंपाउंड येथे घडली आहे. या घटनेने परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी निजामपुरा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. 

तुकाराम पवार ( वय ५५ वर्ष , रा. काटेमानीवली कल्याण ) असे जमावाच्या मारहाण व धक्काबुक्कीत मृत्यू झालेल्या टोरंट पावर कर्मचाऱ्याचे नाव असून ते टोरंट पावरमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते. शनिवारी दुपारी काटई गावातील घरत कंपाउंड येथे वीज चोरी व थकीत वीज मीटरवर कारवाई करण्यासाठी टोरंट पावरचे कर्मचारी गेले असता येथील स्थानिक नागरिकांनी टोरंटच्या या कारवाईस विरोध केला व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व धक्काबुक्की, मारहाण केली. या मारहाणीत टोरंटचे सुरक्षा रक्षक तुकाराम पवार यांना जबर मार लागल्याने त्यांना उपचारासाठी स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात नेले होते मात्र येथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. 

दरम्यान मयत तुकाराम पवार यांची मुले आकाश पवार व प्रकाश पवार या दोन्ही मुलांनी दोषींवर कारवाई करावी व नुकसान भरपाई मिळावी तसेच टोरंट पावर प्रत्येक कारवाई दरम्यान मोठा पोलीस फाटा घेऊन जात असते मात्र आजच्या कारवाई वेळी असा कोणताही पोलीस संरक्षण का घेतला नाही त्यामुळे टोरंट पावर देखील या प्रकरणात दोषी असल्याचा आरोप पवार यांच्या दोन्ही मुलांनी केला आहे.

टोरंट पावर नेहमीच आपल्या कर्मचाऱ्यांची काळजी घेत असते आज झालेली घटना दुर्दैवी असून नागरिकांना जर काही अडचण किंवा शंका असेल तर त्यांनी कार्यालयात यावे अशा प्रकारे कर्मचाऱ्यांना मारहाण करणे चुकीचे आहे. याप्रकरणी टोरंट पावर तर्फे निजामपुरा पोलीस ठाण्यात टोरंटच्या वतीने मारहाण करणाऱ्या इसमा विरोधात तक्रार करण्यात आली आहे. मात्र शवविच्छदन अहवाला नंतर संबंधितांवर पुढील कारवाई व गुन्हा दाखल करण्यात येईल अशी माहिती टोरंट पावरचे जनसंपर्क अधिकारी चेतन बदयानी यांनी दिली आहे.

 

Web Title: Locals beat Torrent Power employees who went to cut off power supply; Death of an employee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.