शासकीय कार्यालयांतील ५० टक्के उपस्थितीमुळे लोकलला गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:52 AM2021-06-16T04:52:14+5:302021-06-16T04:52:14+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : राज्य सरकारने कोरोनाचे निर्बंध शिथिल केले आहेत. शिवाय शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये ४०-५० टक्के कर्मचाऱ्यांच्या ...

Locals crowded due to 50% attendance in government offices | शासकीय कार्यालयांतील ५० टक्के उपस्थितीमुळे लोकलला गर्दी

शासकीय कार्यालयांतील ५० टक्के उपस्थितीमुळे लोकलला गर्दी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : राज्य सरकारने कोरोनाचे निर्बंध शिथिल केले आहेत. शिवाय शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये ४०-५० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीला परवानगी दिली आहे. त्यामुळे उपनगरी लोकल पुन्हा तुडुंब भरून धावू लागली आहे. वाढत्या गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंग व अन्य नियम पाळले जात नसल्याने प्रवाशांची धाकधूक वाढली आहे.

ठाणे जिल्ह्यातील ठाणे, दिवा, कल्याण, डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ आदी रेल्वे स्थानकांतील तिकीट घरांसमोर गर्दी वाढू लागली आहे. त्यावर नियोजन नसल्याने या रांगा रस्त्यापर्यंत पोहोचल्याचे चित्र सोमवारी डोंबिवलीत रामनगर तिकीट खिडकीसमोर दिसून आले. महिला, पुरुष, विद्यार्थी अशा सर्व गटांतील प्रवासी तेथे तिकीट काढण्यासाठी उभे होते. पहाटेपासून सकाळी ९.३० वाजेपर्यंत रांगा असल्याने प्रवासी संघटनांनी नाराजी व्यक्त केली.

एकीकडे गर्दी वाढू नये, यासाठी नियोजन करण्यात रेल्वे सपशेल अपयशी ठरली आहे. तसेच कार्यालयात ५० टक्के उपस्थितीला परवानगी दिल्याने लोकल प्रवासात गर्दीमुळे प्रवास करणाऱ्यांचे हाल होत आहेत. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी त्यात भरडला जात आहे. कामाच्या ठिकाणी आणि प्रवासात गर्दी, यामुळे कोरोनाची लागण झाली तर काय? असा पेच त्यांच्यापुढे आहे. लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी राज्य सरकारने कार्यालयांच्या वेळा बदलणे गरजेचे आहे, पण तसे कोणतेही नियोजन सरकारने केलेले नाही. त्यामुळे पुन्हा ठराविक वेळेत लोकल तुडुंब भरून जात आहेत. कार्यालयांच्या वेळा न बदलल्यास गर्दीमुळे कोरोना पुन्हा डोकेवर काढण्याची भीती प्रवासी संघटनांनी व्यक्त केली आहे.

तपासणी मोहीम सुरू

याबाबत मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी म्हणाले की, शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आपत्कालीन तसेच सरकारी कार्यालये ५० टक्के क्षमतेने सुरू झाली आहेत. त्यामुळे लोकलना अचानक गर्दी वाढल्याचे दिसून येत आहे. गर्दी टाळण्यासाठी प्रवाशांनाही सूचना देण्यात येत आहेत. तसेच बहुतांशी ठिकाणी तपासणी मोहीमही सुरू आहे.

----------

Web Title: Locals crowded due to 50% attendance in government offices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.