कोपरीतील बीएसयूपीच्या इमारती विलगीकरण कक्षाला देण्याचा स्थानिकांचा विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2020 05:44 PM2020-08-14T17:44:42+5:302020-08-14T17:45:53+5:30
कोविड रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष म्हणून वापरास देण्याची निविदा प्रक्रिया काढण्यात येणार असल्याने स्थानिक नागरिकांनी माहापालिकेत धाव घेऊन शर्मा याचे भेट घेतली.
ठाणे : कोपरीमधील सिद्धार्थनगर येथे बीएसयूपीअंतर्गत उभारण्यात आलेल्या इमारती कोविड रुग्णांच्या विलगीकरण कक्ष म्हणून देण्यासाठी स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शविला आहे. यासंदर्भात लाभार्थी नागरिकांनी ठाणे महापालिकेचे आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांची भेट घेऊन लवकरात लवकर आम्हाला आमच्या हक्काच्या घराचा ताबा द्या, अशी मागणी नागरिकांनी आपल्या निवेदनात केली. सिद्धार्थ नगर येथील बांधलेल्या इमारती कोविड रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष म्हणून वापरास देण्याची निविदा प्रक्रिया काढण्यात येणार असल्याने स्थानिक नागरिकांनी महापालिकेत धाव घेऊन शर्मा याचे भेट घेतली.
ठाण्यातील कोपरी भागात असलेले नागरिक गेली 14 वर्ष आपल्या हक्काच्या घराबाहेर राहत आहेत. मूळ जागेवर बीएसयूपी अंतर्गत मिळणाऱ्या इमारती तयार होऊन १ वर्ष पूर्ण झाले. काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना चावी वाटप करण्यात आले होते,मात्र अद्याप नागरिकांना घरांचा ताबा देण्यात आला नसल्याने नागरिकांच्या मनात खंत निर्माण झाली आहे. येथील रहिवाशी सद्यपरिस्थितीत साकेत, वसंत विहार येथील तात्पुरता निवारा इमारतीमध्ये राहत आहोत. यापैकी बरेचसे रहिवाशी हे दारिद्यरेषेखालील आहेत. रहिवाशांचे कामधंदे पूर्वीपासुन कोपरी लगतच्या परिसरात आहेत. मुलांच्या शैक्षणिक संस्था देखील याच परिसरात आहेत. त्यामुळे नागरिकांना रोज कोपरी येण्या-जाण्यासाठी खूप आर्थिक भर्दंड पडतो. हीच बाब लक्षात घेता स्थानिक नगरसेवक भरत चव्हाण यांच्या उपस्थितीत स्थानिकांनी आयुक्त शर्मा याची भेट घेतली.
दरम्यान कोरोनामुक्त वातावरणात बीएसयूपी अंतर्गत सदर इमारती जर कोविड विलगीकरण कक्ष म्हणून प्रस्ताव पास केलात तर आम्ही सगळे रहिवाशी अजुन पुढचे काही वर्षापर्यंत आमच्या घरांचा ताबा मिळण्यापासून वंचित राहू. तसेच सदर इमारतीमध्ये अंतर्गत बदल केला गेला तर त्यांची दुरवस्था होईल. त्यामुळे इमारतीमधील घरांचा ताबा स्थानिक नागरिकांना लवकरात लवकर मिळावा, अशी मागणी स्थानिकांनी आयुक्तांकडे केली.