टोरंटविरोधात स्थानिकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2019 02:07 PM2019-10-31T14:07:22+5:302019-10-31T14:09:43+5:30
महावितरणला सक्षम करा आणि टोरंट कंपनीला हद्दपार करा; गावकऱ्यांची मागणी
ठाणे: कळवा, मुंब्रा, शिळ, दिवा विभागातील वीज वितरण आणि वीज बिल वसुलीचे खाजगीकरण करण्यात आले असून तसे कंत्राट टोरंट या कंपनीला देण्यात आले आहे. महावितरणला सक्षम करा आणि टोरंट कंपनीला हद्दपार करा या मागणीसाठी अनेक दिवसांपासून या भागात आंदोलन सुरु असून आता या आंदोलनाची धार अधिक तीव्र करीत गावकऱ्यांनी आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून शासनाचा निषेध केला.
टोरंट हटाव वीज ग्राहक बचाव अशी मागणी करत जिल्हाधिकारी कार्यालयावर जनमोर्चा टोरेन्ट हटाव कृती समितीने आज काढला. टोरंट हटाव कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी शिवसेनेचे नगरसेवक उमेश पाटील, माजी नगरसेवक हिरा पाटील आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. टोरंट संदर्भात यापूर्वी वारंवार बैठकीचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानुसार तीन वेळा बैठका लावण्यात आल्या होत्या. मात्र त्या तीनही बैठका रद्द करण्यात आल्याचेही पाटील सांगितले. मध्यतंरी खासदार श्रीकांत शिंदे यांनी यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्यापही त्यावर निर्णय न झाल्याची माहिती पाटील यांनी दिली.