अधिवेशनासाठी शाळांना कुलूप
By admin | Published: February 6, 2016 02:07 AM2016-02-06T02:07:26+5:302016-02-06T02:07:26+5:30
शिक्षक अधिवेशनाच्या नावाखाली येथील प्राथमिक शाळांना कुलूप लावण्यात आले आहे. तर, काही शाळांमध्ये माध्यान्ह भोजनानंतर विद्यार्थ्यांना घरी पाठविले जाते
अनिरुद्ध पाटील, बोर्डी
शिक्षक अधिवेशनाच्या नावाखाली येथील प्राथमिक शाळांना कुलूप लावण्यात आले आहे. तर, काही शाळांमध्ये माध्यान्ह भोजनानंतर विद्यार्थ्यांना घरी पाठविले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने पालकवर्गात तीव्र नाराजी पसरली आहे. शाळांना टाळे ठोकणाऱ्या शिक्षकांची चौकशी करून दोषींविरुद्ध कारवाईची मागणी करण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ या संघटनेने नवी मुंबई येथे अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. याकरिता, संघटनेतील शिक्षकांकडून ५०० रु. वर्गणी वसूल करण्यात आली असून अधिवेशन काळात शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. या संघटनेत डहाणू तालुक्यात एक हजार पाचशे बावीस शिक्षकांपैकी एक हजार बारा शिक्षकांचे अर्ज प्राप्त झाल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी अनिल सोनार यांनी दिली. या अधिवेशन काळात बोर्डी परिसरातील बोर्डी केंद्रशाळेसह मानपाडा, वाघमारापाडा, नागणकस, शंकरपाडा, बीजपाडा, अस्वाली या आदिवासी पाड्यांवरील प्राथमिक शाळा बंद असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यापैकी काही शाळांमध्ये एक वा दोन शिक्षक अथवा सहायकांकडून विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन दिल्यानंतर घरी पाठविले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान तर होतेच, शिवाय सुरक्षेचा प्रश्नही निर्माण होतो. (वार्ताहर)सुटी काळात अधिवेशन घ्या, अथवा अधिवेशनाकरिता राज्यभर शाळा बंद ठेवा. मात्र, शाळांना कुलूप लावणाऱ्या शिक्षकांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी.
- प्रशांत पाटील, डहाणू पंचायत समिती सदस्य