लॉकडाऊन... पण, २२ जोडप्यांनी साधला अक्षयतृतीयेचा मुहूर्त!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:38 AM2021-05-15T04:38:40+5:302021-05-15T04:38:40+5:30
स्नेहा पावसकर लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : अक्षयतृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. या दिवशी कोणतेही शुभ कार्य करायला ...
स्नेहा पावसकर
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : अक्षयतृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. या दिवशी कोणतेही शुभ कार्य करायला वेळ पाहावी लागत नाही. या दिवशी अनेक लग्नसोहळे आयोजिले जातात. मात्र गेल्या वर्षी मार्चमध्ये लागलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांना अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर विवाहसोहळे आयोजित करता आले नाहीत. यंदाही लॉकडाऊन लक्षात घेत काहींना विवाहसोहळे रद्द करावे लागले खरे; पण दुसरीकडे हाच मुहूर्त साधत ठाण्यात २२ जाेडप्यांनी रजिस्टर्ड पद्धतीने आपले छोटेखानी विवाहसोहळे पार पाडले.
कोरोनामुळे राज्यात सर्वत्र लॉकडाऊन आणि कडक निर्बंध असल्याने अनेकांनी अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर आयोजिलेले लग्नसोहळे आधीच रद्द केले. ठाण्यात गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांचे प्रमाण सातत्याने कमी होत असले तरी प्रादुर्भाव वाढू नये म्हणून निर्बंध कायम आहेत. तरी गेल्या वर्षापासून रखडलेले विवाहसोहळे यंदा अक्षयतृतीयेला उरकायचे असे अनेकांनी ठरवले होते. मात्र यंदाही एप्रिलपासून लॉकडाऊन जाहीर झाल्याने अनेक विवाह इच्छुकांचा हिरमोड झाला. तसेच त्यांच्या कुटुंबाने केलेल्या नियोजनावरही पाणी फिरले. मात्र, ठाण्यातील २२ जोडप्यांनी अक्षयतृतीयेला नोंदणी विवाह करून ‘मुहूर्त’ साधला.
------------
दरवर्षी या काळात अनेक विवाह होतात. मात्र यंदा एप्रिलपासून लॉकडाऊन असल्याने दररोज ५-६ च विवाह होत आहेत. मात्र शुक्रवारी अक्षयतृतीयेमुळे २२ जोडप्यांचे शुभमंगल झाले, अशी माहिती विवाह नोंदणी अधिकारी ए.एस. यादव यांनी दिली.
-------------------
आम्ही गेल्या वर्षी एप्रिलमध्ये विवाह करणार होतो. मात्र लॉकडाऊनमुळे तो बेत रद्द केला. दिवाळीनंतरच्या काळात घरातील काही जण कोरोनाबाधित झाल्याने सोहळा अक्षयतृतीयेला करण्याचे ठरविले होते. मात्र पुन्हा लॉकडाऊन आणि निर्बंध लागले. त्यामुळे मग नोंदणी पद्धतीने विवाह करायचे ठरवून तारीख नोंदवली आणि आज मुहूर्त साधल्याचे एका जोडप्याने सांगितले.
-------------
नियमांचा अडसर
आम्ही अक्षयतृतीयेचा मुहूर्त पाहून मुलीच्या लग्नासाठी हॉल आणि इतर सर्व तयारी केली होती. पण, लॉकडाऊन आणि निर्बंध पाहता इतक्या कमी माणसांत कसे लग्न उरकायचे, हा प्रश्न आहे. तसेच इतर खरेदीसाठी दुकानेही सुरू नसल्याने आम्ही सोहळाच रद्द केला.
- रमेश पळके, वधूपिता
-----------
मंगलकार्यालयांचे गणित बिघडले
शहरात हजारो मंगलकार्यालये असून आमचे नुकसान होत आहे, असे मत हे मंगलकार्यालय चालक व्यक्त करीत आहेत.
आम्हाला जागेचे भाडे भरावेच लागते. पुन्हा त्याची साफसफाई, त्याचे लाईटबिल भरावे लागते आहे. गेल्या अनेक महिन्यांत विवाहसोहळे झालेच नाहीत. झाले तरी ते अतिशय कमी बजेटचे असतात. त्यातून कोणताही नफा न होता उलट तोटाच होत आहे.
आमचे पडदे, टेबल, खुर्च्या असे अनेक साहित्य खराब होत असल्याचेही मंगल कार्यालय चालक सांगतात.