शहरातील सात प्रभागसमितीमधील ६४ हॉटस्पॉटमध्ये ३१ मार्च पर्यंत लॉकडाऊन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2021 01:09 AM2021-03-09T01:09:40+5:302021-03-09T01:11:31+5:30
ठाणे - मागील काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागला आहे. यामुळे ठाणे महापालिकेने ज्या-ज्या भागांत कोरोनाचे रुग्ण ...
ठाणे- मागील काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागला आहे. यामुळे ठाणे महापालिकेने ज्या-ज्या भागांत कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. असे हॉटस्पॉट शोधले असून सात प्रभाग समितीत, असे तब्बल ६४ हॉटस्पॉट पुढे आले आहेत. त्यामुळे आता या हॉटस्पॉटमध्ये येत्या ३१ मार्च पर्यंत अंशत: लॉकडाऊन घोषीत करण्यात आला आहे, अशी माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.
या संदर्भातील आध्यादेशही काढण्यात आला आहे. या हॉटस्पॉटमधील रहिवाशांनी नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारादेखील पालिकेने दिला आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळून इतर सेवा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेने दिली.
ठाणे महापालिका हद्दीत मागील काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे २८ फेब्रुवारीर्पयत ज्या हॉटस्पॉटमध्ये लॉकडाऊन होता. तो आता पुढील ३१ मार्च र्पयत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. यापूर्वी हॉटस्पॉटचे भाग हे कमी होते. परंतु मागील काही दिवसापासून पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने हॉटस्पॉच्या भागांची संख्यादेखील वाढल्याचे दिसून आले आहे. आजही शहरातील काही महत्वाच्या भागांमध्ये कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत आहे. यामध्ये माजिवडा - मानपाडा, लोकमान्य सावरकर नगर, वर्तकनगर, उथळसर, नौपाडा, कळवा आदी भागांचा समावेश आहे. माजिवडा मानपाडा तर रोजच्या रोज ४० ते ५० रुग्ण आढळून येत आहेत.
दरम्यान मागील काही दिवसांपूर्वी महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी ज्या भागात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, त्या भागांचा सर्व्हे करुन पुढील धोरण निश्चित केले जाईल, असे स्पष्ट केले होते. त्यानुसार आता हा सव्हे झाला असून या सर्व्हेत ७ प्रभाग समितीमधील तब्बल ६४ हॉटस्पॉट दिसून आले आहेत. त्यानुसार आता या हॉटस्पॉटमध्ये येत्या ३१ मार्चर्पयत अंशता लॉकडाऊन करण्यात आला आहे. परंतु हा लॉकडाउन अंशत: जरी सांगितला जात असला तरी तो कडक करण्यासाठी पालिका प्रयत्न करणार असल्याची माहिती महापालिका सुत्रंनी दिली.
या हॉटस्पॉटच्या ठिकाणी राहणाऱ्या नागरीकांसाठी खबरदारीच्या सुचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार आता या ६४ हॉटस्पॉटमध्ये कळवा प्रभाग समितीमधील काही भाग, वागळे, लोकमान्य सावरकर नगर, नौपाडा, उथळसर, माजिवडा- मानपाडा, वर्तकनगर प्रभाग समिती आदी ठिकाणांच्या भागांचा समावेश आहे. या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आजही वाढतांना दिसत आहेत. त्यामुळे या ६४ हॉटस्पॉटमधील सावधानता बाळगावी, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. परंतु नियमांचे पालन न करणाऱ्यांच्या विरोधात नियमानुसार कारवाई करण्याचा इशारादेखील पालिकेने दिला आहे. या हॉटस्पॉट भागांमध्ये यापूर्वी जे र्निबध लावण्यात आले होते, ते र्निबध कायम असतील असेही पालिकेने स्पष्ट केले.
हॉटस्पॉटची ठिकाणं -
कळवा प्रभाग समिती अंतर्गत १२, वागळे इस्टेट ०४, नौपाडा कोपरी ०४, माजिवडा मानपाडा १६, उथळसर -०८, वर्तकनगर ०८, लोकमान्य सावरकर नगर १२