नियम न पाळल्यास ठाण्यात लावणार लॉकडाऊन, पालिका आयुक्तांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 08:31 AM2021-02-20T08:31:05+5:302021-02-20T08:31:23+5:30
coronavirus : कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन महापालिकेने कशा प्रकारच्या उपाययोजना केल्या आहेत, या विषयीची माहिती देण्यासाठी नागरी संशोधन केंद्र येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ठाणे : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन हे संकट वेळीच रोखण्यासाठी मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळा, शासनाने घालून दिलेल्या निर्बंधाचे पालन करा, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी ठाणेकरांना केले आहे. अन्यथा पुन्हा लॉकडाऊन घ्यावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. कोरोनाची वाढती परिस्थिती लक्षात घेऊन साधा सर्दी, ताप आला तरी आधी कोविडची टेस्ट करा, अशा सूचनाही त्यांनी ठाण्यातील खाजगी क्लिनिक आणि रुग्णालयांना दिल्या.
कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन महापालिकेने कशा प्रकारच्या उपाययोजना केल्या आहेत, या विषयीची माहिती देण्यासाठी नागरी संशोधन केंद्र येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दुसरीकडे नियम मोडणाऱ्यांवर पोलिसांच्या मदतीने कडक कारवाईचे संकेत देतानाच कोरोनाची वाढती रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि विलगीकरणावर भर, कोरोना रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी रुग्णवाहिका आणि कोविड केअर सेंटर्स पूर्ववत करण्याचे नियोजन, रेड झोन, प्रतिबंधित क्षेत्रात कडक निर्बंधासाठी गस्ती पथकांची नियुक्ती करण्याबरोबरच नियम मोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला. महापालिकेच्या ग्लोबल इॅम्पॅक्ट हब येथील कोविड सेंटरमध्ये सध्या १०७४ बेड उपलब्ध आहेत. या ठिकाणी २२६ आयसीयु बेड, ५५३ ऑक्सिजन बेड, २९५ साधे बेड सज्ज आहेत. नव्याने ज्युपिटर येथील पार्किंग प्लाझाच्या ठिकाणी उभारलेले कोविड सेंटर पुढील आठवड्यात ठाणेकरांच्या सेवेत सज्ज होणार असून या ठिकाणी एकूण ११७७ बेड उपलब्ध आहेत.
गुन्हे दाखल करणार
कोरोनाचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी विनामास्क फिरणाऱ्यांवर आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम मोडणाऱ्यांवर पोलिसांच्या मदतीने दंडात्मक करवाई करण्यात येणार असून सार्वजनिक ठिकाणी, हॉटेल, लग्न समारंभ, क्लब आदी ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन न करणाऱ्यांवर वेळप्रसंगी गुन्हे दाखल करण्यात येणार असून लायसन्स रद्द करण्याबरोबर, हॉलला सील ठोकण्याची कारवाईदेखील करण्यात येणार आहे. रिक्षामधून जास्तीचे प्रवासी नेल्यास, रिक्षाचालकांनी मास्क न वापरल्यासही कारवाई करण्यात येईल. शिवाय टीएमटी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मास्क वापरणे बंधनकारक केले आहे.