लॉकडाऊनमुळे बदलले ठाण्याच्या खाडीचे रुपडे, पाणी झाले नितळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2020 12:02 AM2020-09-09T00:02:52+5:302020-09-09T00:03:04+5:30
पक्ष्यांसह मासे, कीटकांच्या संख्येत झाली वाढ, कचरा टाकण्याचे प्रमाण झाले कमी
ठाणे : ठाण्याचे वैभव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे खाडीने लॉकडाऊनच्या काळात अविघटनशील घटकांतून मोकळा श्वास घेतल्याचे निरीक्षण पर्यावरण अभ्यासकांनी नोंदविले. लॉकडाऊनच्या चार ते पाच महिन्यांच्या कालावधीत माणसे बाहेर पडली नसल्याने खाडीत प्लास्टीकच्या पिशव्यांत टाकण्यात येणाºया निर्माल्यांचे प्रमाण, देवी-देवतांच्या प्रतिमा व इतर अविघटनशील पदार्थ खाडीत सोडण्याचे प्रमाण कमी झाले. खाडीत अविघटनशील पदार्थ खूप कमी प्रमाणात गेल्याने पक्ष्यांबरोबर मासे आणि कीटकांच्या संख्येतही वाढ झाल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदविले.
खाडी संवर्धनाबाबत अनेक पर्यावरण अभ्यासकांकडून जनजागृती केली जाते. तरीही १०० टक्के खाडी ही प्रदूषणविरहित झालेली नाही. त्यात प्लास्टीकच्या निर्माल्यासह इतर अविघटनशील घटकदेखील सर्रास टाकले जातात. खूप मोठ्या प्रमाणात प्लास्टीकसह निर्माल्य खाडीत टाकण्याचे प्रमाण आता कमी होत असले तरी लॉकडाऊनमध्ये याचा परिणाम अधिक जाणवला. लॉकडाऊनआधी निर्माल्य, प्लास्टीक आणि इतर कचरा टाकला जात होता. पिशवीतून निर्माल्य टाकले जात असल्याने प्लास्टीकचा भस्मासूर निर्माल्याबरोबर यायचा. परंतु, लॉकडाऊनमध्ये खाडीने बºयापैकी मोकळा श्वास घेतला. त्याचबरोबर नैसर्गिक सजीव या लॉकडाऊनच्या काळात वाढू लागले, असे निरीक्षण पर्यावरण दक्षता मंडळाचे ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक डॉ. प्रसाद कर्णिक यांनी नोंदविले. मासे आणि कीटकांचे प्रमाणही वाढायला लागले.
खाडीकिनारी कीटकांची संख्या वाढल्याने पक्ष्यांच्या संख्येतही वाढ होऊ लागली. मांसाहाराचे खरकटे आणि न शिजविलेले अन्न प्लास्टीकच्या पिशव्यांतून गटारीत सोडत असल्याने हा कचरा खाडीत येत होता. तेही कमी झाल्याचे ते म्हणाले.
खाडीकाठी आणि प्रवाहात असलेले खारफुटीचे जंगल हे एकेकाळचे ठाणे शहराचे वैभव होते. आज ते रसातळास गेले आहे. वाढती लोकसंख्या, शहरीकरण, उंचावलेले राहणीमान, औद्योगिकीकरण, प्लास्टीकचा वाढता वापर यांमुळे तयार होणाºया कचºयाचे प्रमाण व प्रकार वाढत जातात; आणि वेगवेगळ्या समस्या निर्माण होताना दिसतात.
गेल्या पाच महिन्यांपेक्षा अधिक काळ सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे मात्र या समस्या काही प्रमाणात कमी झालेल्या दिसत आहेत. पर्यावरणाबाबत जरी काही प्रमाणात जनजागृती निर्माण झाली असली तरी अजूनही कित्येक लोक निर्माल्य प्लास्टीकसकट खाडीमध्ये टाकत असल्याचे दिसून येते. परंतु, लॉकडाऊनमध्ये फुल मार्केट पूर्णपणे बंद असल्यामुळे पूजेमध्ये फुले वापरण्याचे प्रमाण बºयापैकी कमी झाले.
प्लास्टीकसह निर्माल्य खाडीमध्ये टाकले गेले नसल्यामुळे ठाणे खाडीमध्ये निर्माल्यामुळे होणारे प्रदूषण काही प्रमाणात कमी झालेले दिसून आले आहे. रोहित पक्षी व विविध पक्ष्यांची संख्या वाढल्याचे दिसून आले आहे, असे मत ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक डॉ. प्रमोद साळसकर यांनी व्यक्त केले.