Lockdown: ठाणे जिल्हा संपूर्ण लॉकडाऊन; दोन मार्केट सुरू ठेवण्याच्या निर्णयामुळे व्यापाऱ्यांत संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2020 02:07 AM2020-07-03T02:07:08+5:302020-07-03T02:07:25+5:30
ठाणे महापालिकेचा दुजाभाव : व्यावसायिक म्हणतात, कोेरोनाला कसा बसेल आळा?
ठाणे : कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्य्ूाचे प्रमाण वाढत असल्याने ठाणे महापालिकेने गुरुवारपासून १० दिवस संपूर्ण ठाणे शहर लॉकडाऊन केले आहे. त्यानुसार अंतर्गत रस्तेही बंद होते, केवळ मुख्य मार्ग सुरू होते. ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त होता, तर टीएमटी बसमध्ये अत्यावश्यक सेवा वगळून इतरांना प्रवेश नाकारला होता. दुसरीकडे सर्व व्यवहार बंद करण्याचा निर्णय असताना जांभळीनाका आणि इंदिरानगर येथील मार्केट १ वाजेपर्यंत सुरू होते. त्यामुळे सकाळी पहिल्या सत्रात तेथे गर्दी झाल्याने पोलिसांकडून नागरिकांना आवाहन केले जात होते. मात्र, इतर मार्केटमधील व्यापाऱ्यांनी प्रशासनाच्या या दुजाभावावर तीव्र संताप व्यक्त केला.
लॉकडाऊन कालावधीत या दोन मार्केटला एक न्याय आणि इतर दुकानदार आणि मार्केटला दुसरा न्याय का, असा सवाल अनेक व्यापाºयांनी केला आहे. प्रशासनाने पूर्ण लॉकडाऊन सांगितले असताना आम्ही त्याला सहकार्य केले आहे. परंतु, जर अशा पद्धतीने अन्याय होत असेल तर कोरोनाला रोखण्यात प्रशासन कसे यशस्वी होईल, असा सवाल काही व्यापारी आणि दुकानदारांनी केला.
अंतर्गत रस्ते बंद
लॉकडाऊनमुळे शहरातील रस्त्यावरील वाहतूक रेंगाळली होती. अंतर्गत रस्ते बंद होते. शहरातील मुख्य चौकात वाहतूक पोलिसांनी नाकाबंदी केली होती. आनंदनगर चेकनाका येथेही बंदोबस्त होता. अत्यावश्यक सेवेतील नागरिकांनाच येजा करण्याची मुभा होती. तर शहरात रिक्षा, टॅक्सी व खासगी वाहनेही बंद होती.
टीएमटीत ‘नो एण्ट्री’ तर बेस्टमध्ये सर्वांना प्रवेश
महापालिकेच्या परिवहन सेवेच्या रोज १२० च्या आसपास बस रस्त्यावर धावत होत्या, परंतु लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर केवळ ५५ बस रस्त्यावर उतरविल्या होत्या. त्यादेखील केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाºयांसाठीच चालविण्यात येत होत्या. इतर नागरिक बसमध्ये चढल्यास त्याला उतरविले जात होते. परंतु, बेस्टच्या बसमध्ये सर्वांना प्रवेश दिला जात होता. एकूणच मार्केट परिसर वगळता इतर ठिकाणी कडकडीट बंद दिसून आला.
गुरुवारपासून पुन्हा सुरू झालेल्या लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी मुंब्य्रात १०० टक्के प्रतिसाद मिळाला. येथील रेल्वेस्थानकाजवळील प्रमुख बाजारपेठ, जीवन बाग, मुंब्रादेवी रोड, आनंद कोळीवाडा, संजयनगर, अचानकनगर, अमृतनगर, कौसा, गुलाब पार्क बाजारपेठ येथील दूध तसेच मेडिकल व्यतिरिक्त इतर सर्व दुकाने पहाटेपासूनच बंद होती.
वाहनचालकांनीदेखील विनाकारण रस्त्यावर फिरू नये, यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी केली होती. प्रबळ कारणाशिवाय रस्त्यावर वाहने आणलेल्या वाहनचालकांना पुन्हा घरी पाठवले गेले.
कल्याण-डोंबिवलीत कडकडीत लॉकडाऊन
कल्याण-डोंबिवली महापलिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने गुरुवारपासून १२ जुलैपर्यंत कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे शहरांतील प्रमुख रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला. लॉकडाऊन मोडणाºयांवर पोलिसांची करडी नजर असून, नियम मेडणाºया अनेक दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सगळी दुकाने बंद आहेत. औषधाची दुकाने, दूध डेअरीमध्ये ग्राहक अत्यंत तुरळक प्रमाणात दिसून आले. विनाकारण बाहेर पडणाºयांविरोधात गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा पोलीस ठिकठिकाणी रिक्षा फिरवून देत आहेत. दुचाकीवरून डबलसीट प्रवास करणाºयांची पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे. तसेच काही दुचाकीचालकांच्या चाव्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. शहराच्या एण्ट्री पॉइंटवरील नाकाबंदीसाठी तैनात असलेल्या पोलिसांनी बाहेरच्या शहरातील वाहनांना प्रवेश नाकारल्याने शिळफाटा, दुर्गाडी पुलावरून काही वाहने परत पिटाळून लावली.