जनविरोध झुगारून सर्व हॉटस्पॉटमध्ये लॉकडाऊन कायम; सम-विषम नियमाप्रमाणे दुकाने उघडणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 12:44 AM2020-07-20T00:44:41+5:302020-07-20T00:44:49+5:30
अनलॉक-१ मध्ये ‘मिशन बिगिन अगेन’अंतर्गत शहरातील व्यवहार सुरळीत सुरू झाले होते.
कल्याण : ठाण्यापाठोपाठ कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील हॉटस्पॉटमध्ये ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार आहे. अन्य भागात ‘मिशन बिगिन अगेन’ सुरू राहील; पण यामध्ये प्रामुख्याने मॉल्स, मार्केट आणि कॉम्प्लेक्स वगळता सर्व भाजी मार्केटसह बाजारपेठ आणि दुकाने सम-विषम नियमाप्रमाणे उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. ही दुकाने सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत उघडी राहतील, असेही जाहीर केलेल्या परिपत्रकात महापालिकेने नमूद केले आहे.
अनलॉक-१ मध्ये ‘मिशन बिगिन अगेन’अंतर्गत शहरातील व्यवहार सुरळीत सुरू झाले होते. पण, कोरोनाचा वाढलेला प्रादुर्भाव पाहता केडीएमसी परिक्षेत्रात पुन्हा २ ते १९ जुलैदरम्यान लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्चपासून सातत्याने लॉकडाऊन घेण्यात येत असल्याने होणारे नुकसान पाहता पुन्हा लॉकडाऊन नको, असा पवित्रा येथील व्यापाऱ्यांनी घेतला होता. लॉकडाऊनला पुन्हा मुदतवाढ मिळाल्यास रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला होता.
अन्य स्तरांतूनही लॉकडाऊनला विरोध होत असताना केडीएमसीने कल्याण-डोंबिवली शहरांतील ४८ हॉटस्पॉट क्षेत्रात तो ३१ जुलैच्या संध्याकाळी ५ वाजेपर्यंत कायम ठेवला आहे. महापालिकेने जाहीर केलेले हॉटस्पॉट क्षेत्र कल्याणमध्ये २६ तर डोंबिवलीत २२ आहेत. जारी केलेले नवीन नियम पाहता हॉटस्पॉट क्षेत्र वगळता संपूर्ण शहरात मिशन बिगिन अगेनप्रमाणे कार्यवाही होईल.
मॉल्स, मार्केट आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स बंद राहतील. सर्व भाजी मार्केटसह बाजारपेठ आणि दुकाने पी १, पी २ नुसार चालवण्यास परवानगी असेल. सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी दिली गेली आहे. प्रभागक्षेत्र अधिकारी आणि पोलीस पी १ पी २ ठरवतील तर हॉटस्पॉट क्षेत्रात पूर्वीप्रमाणेच निर्बंध लागू राहणार असल्याचे केडीएमसीने जाहीर केले आहे.
भिवंडीतही ३१ जुलैपर्यंत निर्बंध
भिवंडी : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी भिवंडीत १९ जुलैपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. रविवारी या लॉकडाऊनची मुदत संपल्यानंतर मनपा आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी शहरातील कंटेनमेंट झोनमध्ये ३१ जुलैपर्यंत पुन्हा लॉकडाऊन जाहीर केला आहे.
विशेष म्हणजे हा लॉकडाऊन फक्त प्रतिबंधित क्षेत्रात असून शहरातील इतर भागामध्ये सकाळी ९ ते ५ पर्यंत दुकाने सुरु राहणार आहेत. त्यातच व्यापाऱ्यांसाठी समविषम तारखेचे बंधन घालून व्यापाºयांसह नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याच्या सूचना आयुक्तांनी आपल्या आदेशामध्ये दिल्या आहेत.