Lockdown: उद्योजक, व्यापारी नाराज; कोरोना नष्ट करताना आर्थिक पाया उखडण्याची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 03:31 AM2020-07-02T03:31:30+5:302020-07-02T03:31:38+5:30
कोरोनाला नियंत्रित करायचे आहे हे बरोबर आहे. परंतु कोरोना नष्ट करण्याच्या नादात आपण आपली अर्थव्यवस्था नष्ट करून बसणार असल्याची भीती उद्योजक, व्यापारी व्यक्त करीत आहेत
ठाणे : कोरोनामुळे झालेल्या तब्बल ७५ दिवसांच्या लॉकडाऊननंतर गेल्या २५ दिवसात उद्योग, व्यापार सावरण्यास सुरुवात झाली होती. ग्राहकांना दुकानात आकर्षित करण्याचे तर मजुरांना पुन्हा कामावर आणण्याचे प्रयत्न सुरु होते. परंतु महापालिकेने पुन्हा लॉकडाऊन जाहीर केल्याने त्याचे गंभीर परिणाम उद्योग आणि व्यापाऱ्यांना सोसावे लागणार आहेत.
लघु उद्योगांनी महापालिकेचा लॉकडाऊन अपरिहार्यतेतून स्वीकारला असला तरी व्यापाऱ्यांनी मात्र या निर्णयाबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. मागील तीन महिने कोरोनामुळे उद्योग, व्यापार, मार्केट सर्वच बंद होते. जवळजवळ ७५ दिवसांच्या या लॉकडाऊनमध्ये सर्वाचेच हाल झाले. यातून उद्योजक किंवा व्यापारी किंवा साधा भाजी विक्रेताही सुटू शकलेला नाही. त्यानंतर २ जून पासून पहिला अनलॉक जाहीर करण्यात आला. सम आणि विषम तारखांना दुकाने सुरु झाली. त्यामुळे अडचण होत असली तरीही अपरिहार्यतेतून हा निर्णय मान्य केला. अत्यावश्यक सेवेतील उद्योगही सुरु झाले. सर्व काही सुरु होताच त्यांना वाढीव वीजबिलांचा शॉक बसला. यातून ते अद्यापही सावरु शकलेले नाहीत. ही बिले कशी भरायची असा पेच त्यांना सतावत आहे. त्यात कामगारांचे पगार, दुकानाचे भाडे आणि ग्राहकांना आकर्षित करण्याचे आव्हान यातून त्यांना मार्ग काढत उद्योजक, व्यापारी पायावर उभे रहात असताना महापालिकेने पुन्हा १० दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केल्याने पुन्हा सर्व अडखळले आहेत. मागील २५ दिवसात ग्राहक फारसे फिरकले नाहीत. परंतु कामावर असलेल्या कामगारांचे पगार, वीजबील आणि दुकानाचे भाडे कसे द्यायचे, या विंवचनेत ठाण्यातील व्यापारी आहे. लघु उद्योजकही ट्रान्सपोर्ट खर्च वाढल्याने आणि वीजबिलामुळे मेटाकुटीला आले आहेत. परंतु लॉकडाऊन आल्याने आता कसे करायचे, असा पेच त्यांच्याही समोर आहे.
कोरोनाला नियंत्रित करायचे आहे हे बरोबर आहे. परंतु कोरोना नष्ट करण्याच्या नादात आपण आपली अर्थव्यवस्था नष्ट करून बसणार असल्याची भीती उद्योजक, व्यापारी व्यक्त करीत आहेत. लॉकडाऊन म्हणजे पुन्हा पोलिसी राज, दंडेली. छोट्या कारणाकरिता दंडवसुलीचा बडगा किंवा भ्रष्टाचार. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये काही कर्मचाºयांचे फावते. त्याचा व्यापारी व उद्योजकांना जाच होतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
लॉकडाऊनमुळे कोरोनाचा नायनाट झाला तर सगळ्यांच्या दृष्टीने ती चांगली गोष्ट आहे. त्यामुळे लोकांच्या वावरावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. त्याचे स्वागत आहे. जे कारखाने सध्या सुरू आहेत, ते सुरुच राहणार आहेत. हा प्रशासनाचा निर्णय योग्य, परंतु कामगाराला कामाच्या ठिकाणी येताच आले नाही, तर अडचण येईल. - डॉ. अप्पासाहेब खांबेटे, अध्यक्ष, लघु उद्योग संघटना, ठाणे