लॉकडाऊनला कल्याणमध्ये चांगला तर डोंबिवलीत संमिश्र प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:41 AM2021-04-24T04:41:01+5:302021-04-24T04:41:01+5:30
कल्याण: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सुरू असलेला कहर पाहता राज्य सरकारने गुरुवारी रात्री आठ वाजल्यापासून कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. ...
कल्याण: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सुरू असलेला कहर पाहता राज्य सरकारने गुरुवारी रात्री आठ वाजल्यापासून कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. शुक्रवारी दिवसभरातील आढावा घेतला असता कल्याणमध्ये लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद लाभला. डोंबिवलीत मात्र काही ठिकाणी अत्यावश्यक सेवेच्या व्यतिरिक्त अन्य नागरिकांची तसेच खाजगी वाहनांची ये-जा कायम राहिल्याने संमिश्र प्रतिसाद दिसून आला. कल्याणमध्ये पोलिसांची फिरत्या वाहनांमधून गस्त दिसून आली तर डोंबिवलीत मुख्य चौकांमध्ये बंदोबस्त तैनात होता.
देशासह राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव वाढला असताना रुग्णसंख्या वाढीमुळे कल्याण-डोंबिवली ही शहरे देखील कोरोनाची हॉटस्पॉट ठरली आहेत. सद्यस्थितीला याठिकाणी दररोज हजार ते दीड हजाराच्या आसपास रुग्णसंख्या आढळून येत असून काही दिवसांपासून कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांचा आकडाही वाढला आहे. कोरोनाचे वाढलेले संक्रमण पाहता राज्य सरकारने लागू केलेल्या लॉकडाऊनचे नागरिकांकडून काटेकोरपणे पालन होणे आवश्यक असल्याचे आवाहन केडीएमसीसह पोलीस विभागाकडून केले जात आहे. शहरात रिक्षा फिरवून उदघोषणेद्वारे नागरिकांना सतर्कतेचा आणि नियमांचे पालन करण्याचा संदेश दिला जात आहे.
- रेल्वेस्थानकात कडेकोट बंदोबस्त
शुक्रवारी कल्याण रेल्वेस्थानकावर कल्याण लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बलाने कडेकोट बंदोबस्त लावला होता. लोकलमध्ये देखील अत्यावश्यक सेवा म्हणजेच सरकारी कर्मचारी आणि वैद्यकीय आरोग्य विभागाशी संबंधित कर्मचाऱ्यांनाच प्रवासाची मुभा आहे. सर्वसामान्यांना लोकल प्रवास करण्यास मनाई केली आहे. कल्याण रेल्वेस्थानकात फक्त तीन ठिकाणांहून प्रवेश दिला जात आहे. प्रत्येक प्रवेशद्वारावर पोलीस तैनात असून प्रवाशांची ओळखपत्र पाहूनच त्यांना रेल्वेस्थानकात सोडले जात आहे. त्याचप्रमाणे काउंटरवर देखील ओळखपत्र असल्याशिवाय तिकीट दिले जात नसल्याचे चित्र कल्याण स्थानकात पाहायला मिळाले.
-केडीएमटीच्या ४० बस
केडीएमटी उपक्रमाकडून शुक्रवारी ४० बस सोडण्यात आल्या होत्या. मात्र, त्या केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करून दिल्या गेल्या होत्या. रस्त्यावर रिक्षासह अन्य सार्वजनिक वाहतूक सुरू होती. खाजगी वाहनेही तुरळक प्रमाणात दिसत होती. दोन्ही शहरातील अत्यावश्यक सेवेतील मेडिकल दुकाने तसेच उपाहारगृह आणि हॉटेल खाद्यपदार्थ पार्सल सुविधेकरिता सुरू होती.
------------------------------------------------------