CoronaVirus News : कल्याण-डोंबिवलीत लॉकडाऊन?, आमदारांनी बैठकीत केली मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2020 12:40 AM2020-06-21T00:40:18+5:302020-06-21T00:40:33+5:30
वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी शहरात पुन्हा किमान १० ते १५ दिवस लॉकडाऊन करावे, अशी मागणी आमदारांनी शनिवारी झालेल्या पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीत केली आहे.
कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपा हद्दीतील कोरोनाच्या रुग्णांची संख्या तीन हजारांच्या घरात गेली आहे. त्यामुळे वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी शहरात पुन्हा किमान १० ते १५ दिवस लॉकडाऊन करावे, अशी मागणी आमदारांनी शनिवारी झालेल्या पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीत केली आहे. त्यावर, शहराच्या पातळीवर लॉकडाऊन लागू करण्याबाबत आयुक्त निर्णय घेऊ शकतात, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी अत्रे रंगमंदिरातील कॉन्फरन्स हॉलमध्ये बैठक घेतली. या वेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर, भाजप आमदार रवींद्र चव्हाण, गणपत गायकवाड, मनसेचे आमदार राजू पाटील, महापौर विनीता राणे, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी उपस्थित होते.
अनलॉक-१ मध्ये शहरातील जनजीवन पूर्वपदावर येऊ लागल्याने नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र, कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता भिवंडी महापालिकेच्या महासभेत शहरात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला. केडीएमसी हद्दीतही रुग्णांची संख्या वाढली असून मृतांची संख्याही ६९ वर पोहोचली आहे. त्यामुळे वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी पुन्हा १५ दिवसांचे लॉकडाऊन करावे, अशी मागणी मनसेचे आमदार पाटील यांनी केली. आमदार चव्हाण, गायकवाड, भोईर यांनी ही मागणी उचलून धरली. त्यामुळे या मागणीचा विचार प्रशासनाने करावा, अशा सूचना पालकमंत्री शिंदे यांनी महापालिका आयुक्तांना दिल्या आहेत.
सध्या कंटेनमेंट झोनचे पालन केले जात असले, तरी रुग्णांची संख्या काही कमी होत नाही. बैठकीनंतर १० ते १५ दिवसांचा लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने अथवा एकाच वेळी करण्यासाठी नियोजन केले जाईल, असे सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.
दरम्यान रुग्णांना बेड, आॅक्सिजन व व्हेंटिलेटरची सुविधा मिळत नाही. उपचार न मिळाल्याने रुग्णांचे मृत्यू होत आहेत, याकडे आ. चव्हाण व गायकवाड यांनी यावेळी लक्ष वेधत प्रशासनास फैलावर घेतले.
>बेड वाढवण्याचे आदेश
पालकमंत्री शिंदे यांनी बैठकीनंतर सांगितले की, ‘वाढती रुग्णसंख्या पाहता आॅक्सिजन व व्हेंटिलेटर बेडची संख्या वाढविण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार, त्यांच्याकडून काम सुरू आहे. राज्य सरकारने १७ कोटींचा निधी केडीएमसीला दिला आहे. कोविड उपचारासाठी हा निधी खर्च केला जाणार आहे. आणखीन निधीची आवश्यकता भासल्यास कोविडसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही.’