Lockdown News: मुंब्य्रातील नागरिकांपुढे प्रशासन हतबल; बिनधास्तपणे होतंय सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2020 02:56 AM2020-05-09T02:56:14+5:302020-05-09T02:56:37+5:30
फेरीवाल्यांनी मुख्य बाजारपेठांऐवजी वसाहती तसेच गृहसंकुलांजवळ जाऊन व्यवसाय करण्याचे आवाहन ठामपाच्या अधिकाऱ्यांनी केले होते.
कुमार बडदे
मुंब्रा : लॉकडाऊनला स्थानिक नागरिक अपेक्षित प्रतिसाद देत नसल्यामुळे अधिकारी आणि कर्मचारी हतबल झाले आहेत. हीच परिस्थिती कायम राहीली तर मुंब्य्रातील परिस्थिती आणखी भीषण होण्याची भीती व्यक्त होत आहे.
मुंब्य्रातील विविध भागांमध्ये कोरानाबाधित रुग्ण सातत्याने आढळत आहेत. गुरुवारी संध्याकाळपर्यत येथील रुग्णसंख्या ७२ वर पोहचली होती. यातील तिघांचा मृत्यू झाला असून १८ जण कोरोनामुक्त तर ५१ जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बाधितांची संख्या आणखी वाढू नये, यासाठी ठामपा प्रशासन मागील काही दिवसांपासून येथील नागरिकांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे, तसेच अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा असे वारंवार आवाहन करत आहे. परंतु या आवाहनाकडे दुर्लक्ष करुन येथील अमृतनगर, रशिद कम्पाउंड, कौसा, रेल्वे स्थानकाजवळील परिसर तसेच गल्लीबोळांमध्ये काही नागरीक खरेदी करण्यासाठी, तर काही जण टाईमपास म्हणून वाट्टेल तेव्हा बिनधास्तपणे सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करुन वावरत आहेत.
त्यामुळे येथील नागरिक कोरोनाकडे अजूनही गांभिर्याने बघत नसल्याचे दिसून येते. येथील फेरीवाल्यांनी मुख्य बाजारपेठांऐवजी वसाहती तसेच गृहसंकुलांजवळ जाऊन व्यवसाय करण्याचे आवाहन ठामपाच्या अधिकाऱ्यांनी केले होते. या आदेशाला न जुमानता फेरीवाले एकमेकांना चिकटून बसून फळे तसेच भाजीविक्री करत आहेत. पोलीस तसेच ठामपाचे कर्मचारी कारवाईसाठी आल्यानंतर तेवढ्यापुरते लपणारे फेरीवाले त्यांची पाठ फिरताच पुन्हा त्यांच्या व्यवसायाला सुरवात करत असल्याचे दृश्य मागील काही दिवसांपासून येथे दिसत आहे. या सर्व प्रकारांमुळे येथील नागरिकांसमोर हतबल झालो असल्याचे ठामपाचे काही अधिकारी खाजगीत बोलत आहेत.