Lockdown News: गावी जाऊ इच्छिणाऱ्यांनी गर्दी केल्याने गोंधळ; पोलिसांनी केली मध्यस्थी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2020 06:22 AM2020-05-07T06:22:42+5:302020-05-07T06:22:52+5:30
वैद्यकीय तपासणीसाठी डोंबिवलीत झुंबड
डोंबिवली : गावाला जाण्यासाठी वैद्यकीय चाचणी करण्यासाठी केडीएमसीच्या ‘ग’, ‘फ’ प्रभाग क्षेत्र कार्यालयात बुधवारी नागरिकांनी गर्दी केल्याने फिजिकल डिस्टन्सचे तीनतेरा वाजल्याचे पाहायला मिळाले. अखेर, पोलिसांनी हटकल्यानंतर काही काळ तणाव निर्माण झाला होता.
केडीएमसीच्या कार्यालयांबाहेर पहाटेपासून नागरिकांनी रांग लावलेली होती. त्यात उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश व राजस्थानमध्ये जाणाºया नागरिकांची जास्त गर्दी होती. प्रभाग क्षेत्र कार्यालयात मात्र प्रवेशद्वारातून एकावेळी पाच ते सात जणांना प्रवेश दिला जात होता. त्यामुळे आत गर्दी नसली तरीही रस्त्यावर मात्र फतेह अली पथ, मेहता आणि फडके रोडवर नागरिकांची गर्दी झाली होती. पोलिसांनी त्यांना दुंडके घेत मोजमाप करून अंतर करून दिले होते. त्यानंतरही नागरिक ऐकत नव्हते. अखेरीस पोलिसांनी आपल्या खाक्या दाखवत त्यांना वेगळे उभे राहण्याचे आवाहन केले. मात्र, महिला, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांचे त्यात हाल झाले.
स्थलांतरित कुटुंबाची अखेर पुणे येथे रवानगी
लॉकडाउनपूर्वी टिटवाळ्यातील आपल्या नातेवाइकांकडे आल्यानंतर येथेच अडकून पडलेल्या एका कुटुंबाच्या कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर त्यांना शिधा आणि प्रवासखर्च देत त्यांच्या पुण्यातील मूळ गावी पाठविणाºया कल्याण गुन्हे शाखेच्या अधिकारी आणि कर्मचाºयाचे कुटुंबांनी आभार मानले.
पुण्यातील ढेबेवाडी परिसरात राहणारे एक दाम्पत्य आपली पाचवर्षीय मुलगी, मेहुणी आणि सासूसह मोहने येथील आपल्या नातेवाइकांकडे राहायला आले होते. याच दरम्यान, लॉकडाउन जाहीर झाले. ज्या नातेवाइकांकडे हे कुटुंब राहायला आले होते, त्या नातेवाइकांचे घर लहान असल्याने त्यांच्याकडे इतके दिवस कसे राहायचे हा विचार करून या कुटुंबाने मोहने येथील निवारा केंद्रात आश्रय घेतला. या कुटुंबाला स्थानिक नगरसेवक आणि केडीएमसी प्रशासनातर्फे मागील महिनाभरापासून अन्नवाटप करण्यात येत होते.
राज्यात आणि राज्याबाहेर अडकलेल्यांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी केंद्र शासनाने निर्देश जारी केले. त्यानंतर, कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद पंजे, पोलीस उपनिरीक्षक मारुती दिघे आदींनी या कुटुंबाची मोहने येथील निवारा केंद्रात भेट घेतली. या कुटुंबाची अडचण लक्षात घेत पोलीस अधिकाऱ्यांनी या कुटुंबीयांची केडीएमसीमार्फत वैद्यकीय तपासणी केली. तसेच, त्यांना लागणारे ना हरकत प्रमाणपत्र मिळवून देण्यास मदत केली.
मोहने येथून त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी लागणाºया योग्य कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर पोलिसांनी या कुटुंबीयांना वाहनाची व्यवस्था करून दिली. तसेच, त्यांना आवश्यक शिधा व प्रवासासाठी मदत देऊन त्यांच्या गावी बुधवारी दुपारच्या सुमारास रवाना केले. त्यामुळे या कुटुंबियांनी पोलिसांचे आभार मानले.