Lockdown News: प्रमाणपत्रासाठी मजुरांची डॉक्टरांकडून लूट; वैद्यकीय दाखल्यासाठी पैशांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2020 12:01 AM2020-05-04T00:01:28+5:302020-05-04T00:01:41+5:30
केवळ ताप, सर्दी, खोकला आहे की नाही, हे तपासण्यासाठी डॉक्टर एकेका मजुराकडून ३00 ते ४00 रुपये उकळत आहेत.
ठाणे : लॉकडाउनमुळे ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बांधकाम मजूर अडकून पडले आहेत. राज्य सरकारने परराज्यांतील मजुरांना गावी पाठविण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी विविध कागदपत्रे जमविण्याची मजुरांची धावपळ सुरू झाली आहे. अशावेळी झोपडपट्ट्यांमध्ये दुकाने थाटून बसलेल्या काही डॉक्टरांकडून आरोग्य प्रमाणपत्र देण्यासाठी मजुरांची आर्थिक पिळवणूक करण्याचे प्रकार ठिकठिकाणी घडू लागले आहेत.
देशात लॉकडाउनचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. त्यामुळे मजूर, कामगार, पर्यटक विविध राज्यांत अडकून पडले आहेत. त्यांची अडचण लक्षात घेता केंद्राने राज्यांच्या मदतीने त्यांना त्यांच्यात्यांच्या राज्यांत पाठवण्याची व्यवस्था केली आहे. महाराष्ट्र सरकारदेखील या कामात गुंतले आहे. त्यानुसार, ठाण्यातही मजुरांची अर्ज भरून नोंदणी करण्यास सुरुवात केली आहे.
अर्जासोबत मजुरांना त्यांच्या गावचा पत्ता, आधारकार्ड झेरॉक्स, डॉक्टरांचे फिटनेस प्रमाणपत्र आदी कागदपत्रे जमवावी जात आहेत. त्याकरिता गरजू मजुरांची इतर कागदपत्रांसह डॉक्टरांकडून आरोग्य प्रमाणपत्र मिळवण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. रुग्णांवर उपचार करताना आपणासही कोरोनाचा संसर्ग होईल, या भीतीने झोपडपट्टी भागातील अनेक डॉक्टर त्यांचे दवाखाने बंद करून घरी बसले होते. ते आता मजुरांना प्रमाणपत्र देण्यासाठी दवाखाने उघडू लागले आहेत.
केवळ ताप, सर्दी, खोकला आहे की नाही, हे तपासण्यासाठी डॉक्टर एकेका मजुराकडून ३00 ते ४00 रु पये उकळत आहेत. गावी जाण्यासाठी आतुरलेले हे गोरगरीब डॉक्टरांकडून होणारी पिळवणूक अगतिकपणे सहन करत आहेत.
डॉक्टरची पोलीस ठाण्यात वरात
ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात एमआयडीसी असून, त्यामुळे परराज्यांतील मजुरांचे या भागात मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. या भागातही वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी डॉक्टरांकडून मजुरांची मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक सुरू आहे. त्यामुळे चिडलेल्या काही लोकांनी एका डॉक्टरची चक्क वागळे इस्टेट पोलीस ठाण्यापर्यंत वरात काढली. मात्र, त्याने मधूनच पळ काढल्याचे काही मजुरांनी सांगितले. पालिकेच्या आरोग्य विभागासह पोलिसांनी या घटनांकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
कोरोनासारख्या भीषण संकटाच्या काळातही गोरगरिबांना लुटणाऱ्यांचे प्रमाण कमी झालेले नाही. वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी होणारी आर्थिक लूट, हादेखील त्याचाच एक भाग आहे.