Lockdown News: छावण्यांमध्ये अडकून पडलेल्या मजुरांचे भवितव्य अधांतरीच; अर्धपोटी काढतात दिवस

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2020 01:53 AM2020-05-08T01:53:18+5:302020-05-08T01:53:31+5:30

सर्वांनाच लागली गावी जाण्याची आस

Lockdown News: The future of the workers trapped in the camps is uncertain; Half a day | Lockdown News: छावण्यांमध्ये अडकून पडलेल्या मजुरांचे भवितव्य अधांतरीच; अर्धपोटी काढतात दिवस

Lockdown News: छावण्यांमध्ये अडकून पडलेल्या मजुरांचे भवितव्य अधांतरीच; अर्धपोटी काढतात दिवस

Next

सुरेश लोखंडे 
 

ठाणे : कोरोनाच्या संचारबंदीत जिल्ह्यातील सहा महापालिका, दोन नगरपालिकांसह गावखेड्यांत हजारो कामगार, मजूर आजही अडकलेले आहेत. त्यांच्यासाठी असलेले कम्युनिटी किचनचे जेवण शहरांमधील झोपडपट्ट्यांत कार्यकर्त्यांच्या माध्यमातून वाटप होत आहे. मात्र, निवारा केंद्र, छावण्यांमधील कामगार, मजुरांचे जेवणाअभावी हाल असून ते अर्धपोटी आहेत. अनेकांची अद्यापही वैद्यकिय तपासणी झालेली नाही. त्यातच पदरचा पैकाही संपल्याने, अन् सरकारी यंत्रणेने श्रमिक रेल्वेबाबत विचारणाही न केल्याने हे मजूर अधांतरी लटकलेले आहेत.

या महामारीत वेगवेगळ्या पद्धतीने हात धुवून घेणाऱ्या राजकारण्यांनी एकमेकांवर आरोप, प्रत्यारोप करून कम्युनिटी किचनच्या अन्नधान्यातील अपहार, उपचारासाठी खाजगी हॉस्पिटल उघडे केल्याच्या दाईत्वात लाखोंची डील कल्याण डोंबिवलीत ऐकवली जात आहे. याप्रमाणेच ठाण्यातही असून औषधोपचाराच्या साहित्य खरेदीतील घोळ आदी सर्वांची संचारबंदी उठल्यानंतर विचारणा करणार असल्याचे जाणकारांनी सांगितले.

सध्या जिल्ह्यातील काही शहरांमध्ये वाढलेल्या रुग्णांना आळा घालण्यासाठी जनमाणसाचा कानोसा लोकमतने ' वैद्यकीय कर्मचाऱ्यांची निवास व्यवस्था रुग्णालयांजवळच करण्याची गरज' या मथळ्याखाली २९ एप्रिलला वृत्त प्रसिद्ध करून शासनाचे लक्ष वेधले होते. परंतु, तब्बल एक आठवड्यानंतर त्याची दखल घेऊन आता कुठे अत्यावश्यक देणाºयांची निवास व्यवस्था मुंबईत केली जात आहे. या कालावधीत वाढलेल्या रुग्ण संख्येमुळे लॉकडाउन वाढला आणि ठाणे, केडीएमसी, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भार्इंदर या महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या क्षेत्रात अडकलेले मजूर मरणयातना भोगत आहे.

१३ हजार मजुरांची ठाण्यात सोय
ठाण्यात दादोजी कोंडदेव क्रीडागृहात २७१ जणांची तर पातलीपाडा येथील शाळेत १६, वर्तकनगरच्या शाळेत ४, विटाव्याला ४९, नाइटशेल्टर नौपाडा येथे १६, टेंभीनाका शाळांमध्ये सात तर शहरातील बांधकाम सुरूअसलेल्या इमारतींमध्ये १३ हजार २२५ मजुरांना ठेवण्यात आले आहे. महापालिकेकडून त्यांना रोज खाद्यपदार्थ दिले जात असल्याचा दावा केला जात आहे. याशिवाय पाणी, फूड पॅकेट, किराणाही पुरविला जात आहे. परंतु, या सर्वच ठिकाणी ही मदत पोहचेल, याची खात्री नसल्याचे या साइटवरील ठेकेदार आणि मजुरांकडून ऐकायला मिळत आहे.

उल्हासनगरात ५० हजार कामगारांना जेवण
उल्हासनगर महापालिकेने शहाड, कॅम्प नं-५ येथे टेऊराम व कोनगाव येथे क्वारंटाइन कक्ष उभारला आहे. येथे झोपडपट्टीत राहणाºयांसह स्थलांतरित मजूर ५० हजारांवर आहेत. त्यांना शासनाच्या ठिकठिकाणच्या कम्युनिटी किचनमधील जेवण पुरवले जात आहे. याशिवाय थारासिंंग दरबार, अमृतवेल, झुलेलाल संस्था, वेदान्त आदी सामाजिक संस्था दररोज ६० हजार नागरिकांना मोफत जेवणाचा पुरवठा करीत आहे. महापालिका दररोज ५०० पेक्षा जास्त नागरिकांना स्वखर्चाने जेवणाचे पॉकेट देत असल्याची माहिती पालिका उपायुक्त संतोष देहरकर यांनी दिली. मात्र, हजारो परप्रांतीय मजुरांनी गावी जाण्यासाठी मेडिकल सर्टिफिकेटसाठी शासकीय व खाजगी रुग्णालयांसमोर रांगा लावल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे.

भिवंडीतून चार रेल्वे रवाना
कामगार नगरी व कापड उद्योगाचे मँचेस्टर म्हणून भिवंडीची ओळख असल्याने परप्रांतीय मजूर हजारोंच्या संख्येने भिवंडीत वास्तव्यास आहेत. ग्रामीण भागात गोदामपट्टा वाढल्याने भिवंडीतील यंत्रमाग व परप्रांतीयांची संख्या काही लाखांवर गेली आहे. या संचारबंदीत रोजंदारीवर काम करणाºया मजुरांवर उपासमारीची वेळ आली. मजूर पायपीट करून घरचा रस्ता धरत आहेत. शहरात पाच प्रभागांत पाच ठिकाणी व तालुक्यात २२ ठिकाणी कम्युनिटी किचन सुरू केले आहे. शहरातील स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयास कोविड रुग्णालय म्हणून घोषित केले आहे. रांजनोलीनाका येथील टाटा आमंत्रण प्रकल्पात सरकारच्या अधिकार कक्षेतील क्वॉरंंटाइन कक्षात सध्या ३१४ जणांना तर शहरात ५५ नागरिकांना क्वॉरंटाइन केले आहे. भिवंडीत परप्रांतीय कामगार अधिक असल्याने गोरखपूर,जयपूर आणि पाटणा अशा चार ट्रेन आतापर्यंत रवाना केल्या आहेत.

श्रमिकांसाठी इंटकने उघडले ठाण्यात मार्गदर्शन केंद्र : गावी जाऊ इच्छिणाºया मजुरांना त्याविषयीच्या कार्यालयीन प्रक्रियेची माहिती नसल्याने त्यांची नाहक धावपळ होत आहे. ही बाब लक्षात घेऊन अशा नागरिकांच्या मदतीसाठी गुरुवारी ठाण्यात काँग्रेसने मार्गदर्शन व मदत केंद्र सुरू केले. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ठाणे काँग्रेस शहराध्यक्ष मनोज शिंंंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा इंटक काँग्रेस अध्यक्ष सचिन शिंंदे यांनी ठाणे जिल्हा मध्यवर्ती काँग्रेस कार्यालय येथे मदत केंद्र सुरू केले.

Web Title: Lockdown News: The future of the workers trapped in the camps is uncertain; Half a day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.