लॉकडाऊनमुळे कुर्बानीची संख्या घटली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2020 01:16 AM2020-08-02T01:16:03+5:302020-08-02T01:16:32+5:30
मुलांनाही मिळाली नाही ईदी । रोजगार बुडाल्याने झाला परिणाम
कुमार बडदे
मुंब्रा :कोरोनामुळे कंटेनमेंट झोन परिसरात कडक लॉकडाऊन पाळला जात असल्याने त्याचा फटका यावर्षी बकरी ईदनिमित्त दिल्या जाणाऱ्या कुर्बानीला बसला. लहान मुलांना हक्काच्या ईदीलाही मुकावे लागले. कंटेनमेंट झोनमधील व्यवहार सुरळीत सुरु झालेले नाहीत. यामुळे अद्यापही अनेकांना मोठ्या प्रमाणावर अर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यावर्षी बकऱ्यांच्या किमंती श्रेणीनुसार चार ते सहा हजार रुपयांनी वाढल्या होत्या. यामुळे अनेकांनी यावर्षी कुर्बानी न देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कुर्बानीची संख्या घटल्याची माहिती इक्बाल शेख याने दिली.
ईदच्या दिवशी घरी भेटण्यासाठी येणाºया लहान मुलांना ईदी (पैसे) देण्याची प्रथा आहे. परंतु लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार दीर्घकाळ बुडाल्याने यावर्षी बहुतांश मोठ्याचा खिसा रिकामा असल्यामुळे त्यांनी लहान मुलांना ईदी देण्याचे टाळले. यामुळे चिमुरड्याचा हिरमोड झाला. मागच्या वर्षीच्या ईदला ईदी म्हणून दीडशे ते दोनशे रुपये मिळालेल्या अनेक चिमुरड्यांना शनिवारी संध्याकाळपर्यंत ईदी म्हणून एक रुपयाही मिळाला नव्हता. दरम्यान सरकारी निर्देशानुसार शनिवारी मुंब्रा येथील नागरीकांनी ईदची नमाज घरांमध्ये अदा केली.
देशातील कोरोनाचे संकट लवकर दूर व्हावे, अशी दुआँ (प्रार्थना) मागितली. ज्यांनी कुर्बानीसाठी बकरे खरेदी केले होते त्यांनी नमाज नंतर कुर्बानीची प्रथा पार पाडली. ईद निमित्त चौकाचौकांमध्ये कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नागरीकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळत शांततेने ईद साजरी केल्याची माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली.
भिवंडीत बकरी ईद साधेपणाने साजरी
भिवंडी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी बकरी ईद साधेपणाने साजरी झाली. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करण्यास मनाई असल्याने मुस्लिम बांधवांनी घरातच नमाज अदा करून एकमेकांना शुभेच्छा दिल्या. शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. मशिदीत कुणीही जाऊ नये, असे यापूर्वीच सांगण्यात आले होते.