लॉकडाऊनमुळे शहरातील कचऱ्यात प्रतिदीन ३५० मेट्रीक घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 04:49 PM2020-05-28T16:49:38+5:302020-05-28T16:49:54+5:30
कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनच्या काळात वातावरणात अनेक चांगले बदल दिसून आले आहेत. तसाच काहीसा बदल शहरात निर्माण होणाऱ्याकचऱ्यातही दिसून आला आहे. शहरातील प्रतिदिन निर्माण होणाऱ्या कचऱ्यात ३५० मेट्रीक टन घट झाल्याचे दिसून आले आहे.
ठाणे : कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्याने वातावरणातही अनेक चांगले बदल झाल्याचे दिसून आले आहे. प्रदुषणही कमी झाल्याचे दिसून आले आहे. दुसरीकडे हे बदल वातावरणात होत असतांना शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्यातही घट झाल्याची माहिती पुढे आली आहे. महापालिका हद्दीत लॉकडाऊन आधी रोज ९६३ मेट्रीक टन कचरा निर्माण होत होता. परंतु एप्रिल आणि मे या दोन महिन्यांच्या कालावधीत प्रतिदिन त्यात ३५० मेट्रीक टन कचऱ्याची घट झाल्याचे दिसून आले आहे.
ठाणे महापालिका हद्दीत दिवसेंदिवस कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा कालावधीही वाढविला जात आहे. संपूर्ण ठाणे शहरच आता रेड झोनमध्ये आले आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवांवरही त्याचा परिणाम झाला आहे. यामुळे शहरात वाहनांचा वेग मंदावल्याने त्याचा चांगला परिणाम दिसून आला आहे. वातावरणातील प्रुदषणही कमी झाल्याचे दिसून आले आहे. तलाव, खाडीतील प्रदुषणातही घट झाल्याचे दिसून आले आहे. तर ठाणे महापालिका हद्दीत याच लॉकडाऊनमुळे शहरात रोज निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर देखील परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. शहरात लॉकडाऊन लागू होण्यापूर्वी प्रतिदीन ९६३ मेट्रीक टन विविध कचऱ्याची निर्मिती होत होती. परंतु लॉकडाऊन लागू झाल्यापासून शहरातील कचऱ्यामध्येही घट झाल्याचे दिसून आले आहे. शहरात आता प्रतिदीन ३५० मेट्रीक कमी कचरा तयार होत असल्याची माहिती महापालिकेच्या सुत्रांनी दिली आहे. सोसायटी, झोपडपटटी भागातून कचरा कमी झालेला नाही. परंतु कर्मशिअल ठिकाणांवरील कचरा कमी झाल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. शहरात अनेक ठिकाणी बाजार बंद झाले आहेत, भाजी मार्केट बंद आहेत, व्यावासायिक दुकाने, हॉटेल आदी बंद झाल्याने त्यांचा कचरा तयार होत नाही. त्यामुळे कचऱ्याच्या निर्मितीवरही परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. यामध्ये सर्व प्रकारच्या कचऱ्याचा समावेश आहे. या कचऱ्याच्या कमी झालेल्या निर्मितीमुळे शहरातील बाजारपेठात कचऱ्याची दुर्गंधी बंद झाली आहे, येथील रस्ते साफ, स्वच्छ दिसत आहेत. शहरातील इतर ठिकाणचे रस्तेही स्वच्छ दिसत आहेत.