लॉकडाऊन म्हटले की पोटात गोळा येतो!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:41 AM2021-04-20T04:41:38+5:302021-04-20T04:41:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : हाताला काम नाही, पण घरच्यांच्या अपेक्षा काय कमी असतात का? सरकारला काय ऊठसूट लॉकडाऊन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : हाताला काम नाही, पण घरच्यांच्या अपेक्षा काय कमी असतात का? सरकारला काय ऊठसूट लॉकडाऊन घ्यायला जाते. सामान्यांची अर्थव्यवस्था कोणी बघायची? सरकारी फतवा काढून थोडेच पोट भरते. आता वर्ष झाले हाताला काम नाही. त्यामुळे लॉकडाऊन म्हटले की पोटात गोळा येतो. कोणाकडे दाद मागायची? कोणीच मदतीला येत नाही. त्यामुळे पुन्हा कडक लॉकडाऊन, बाहेर पडायचे नाही हे चालणार नाही. आम्हाला संसार आहे. त्यामुळे ताे चालविण्यासाठी कामधंदा हवाच, असे मत शहरातील घरकाम करून कुटुंबाची गुजराण करणाऱ्या महिलांनी व्यक्त केले.
गतवर्षी न भूतो असा लॉकडाऊन अगदी मार्चपासून नोव्हेंबर, डिसेंबरपर्यंत चालला. त्यानंतर अनलॉकचे नियम असे काहीना काही सुरूच आहे, त्यातून मार्ग निघत नाही ताेच लगेच आता पुन्हा लॉकडाऊन, संचारबंदी सुरू झाली हे योग्य नाही, असे मत महिलांनी व्यक्त केले.
सरकार धान्य देण्याचे म्हणते, पण ते मिळविताना किती अडचणी येतात. अनेकांना मिळत नाही, ज्यांना मिळते ते समाधानी नाहीत. सांगा कसे दिवस काढायचे? महागाई वाढत चालली, मुले शाळा नसल्याने शिक्षणाविना मोठी होत आहेत, त्यासोबत त्यांच्या अपेक्षा वाढत असतात. आईवडिलांकडे नाही तर कोणाकडे ते मागणार? सरकार थोडेच येते गरजा भागवायला. त्यामुळे यापुढे कोरोना असो नसो. लॉकडाऊन नको, असा पवित्रा महिलांनी व्यक्त केला.
* शहरात बहुतांशी इमारतींच्या ठिकाणी घरातील धुणी-भांडी, लादी-पोछा करण्यासाठी प्रति कामाचे ५०० ते ७०० रुपये घेतले जातात, साधारणपणे ५ घरांचे काम काही महिला करतात. असे करून महिन्याला १० ते १२ हजार रुपये कमावतात. पण, त्यांची ही कमाई वर्ष झाले बंद झाली आहे. त्यात लॉकडाऊन म्हटले की समस्यांत वाढ होणार असल्याने सामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
-----------
प्रतिक्रिया
* लॉकडाऊन नको, हाताला काम द्या. वर्ष, दीड वर्ष झाले उत्पन्न बंद झाले. मुलाबाळांच्या अपेक्षा, त्यांच्या गरजा पूर्ण कशा करायच्या? सरकार काही देत नाही, एक-दोन वेळा अन्नधान्य दिले म्हणजे प्रश्न सुटले असे होत नसते.
- संजना पांचाळ
* मला लॉकडाऊनआधी सुमारे २० हजार रुपये पगारवाली नोकरी होती. पण, आता ते काम मिळत नाही. कामाला लावायचे म्हटले तरी काही जण पैसे मागतात. ते कुठून द्यायचे? कसे बसे दिल्यावर पुन्हा लॉकडाऊन लागले आणि नोकरी सुटली तर काय करायचे? खूप तणाव येतो. बस झाले लॉकडाऊन वगैरे. उपाययोजना करा आणि यातून सोडवा.
- सुप्रिया पाटील
* सुरुवातीला लॉकडाऊनचे काही वाटले नाही, पण आता दडपण येते. घरात मुली, नवरा आहे. मुले माेठी होत आहेत. त्यांना परिस्थितीचे गांभीर्य आहे. पण, तरीही अपेक्षा असतातच ना? हाताला काम मिळायला हवे. वर्ष झाले. आर्थिक नुकसान कसे भरून काढायचे? सरकार थोडी येणार आहे त्यासाठी.
- वंदना जोशीकर
-------