नियम पाळले नाहीत तर ठाण्यात लॉकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:40 AM2021-03-16T04:40:42+5:302021-03-16T04:40:42+5:30
ठाणे : गेल्या काही दिवसांपासून ठाण्यात कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. परंतु, तरीही ठाणेकर शासन किंवा महापालिकेने ...
ठाणे : गेल्या काही दिवसांपासून ठाण्यात कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. परंतु, तरीही ठाणेकर शासन किंवा महापालिकेने घातलेले नियम पाळत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे लोकांनी नियम पाळले नाहीत आणि कोरोनाचे रुग्ण असेच वाढत राहिले, तर लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय शिल्लक नसेल, असा इशारा महापौर नरेश म्हस्के यांनी सोमवारी दिला.
आपल्या दालनात त्यांनी सोमवारी वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येवर काय उपाययोजना करण्यात येत आहेत, कशा प्रकारची तयारी केली आहे, याचा आढावा घेतला. या बैठकीला महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी, अतिरिक्त आयुक्त, सर्व उपायुक्त, सर्व सहायक आयुक्त उपस्थित होते.
यावेळी कोरोनाशी लढा देण्यासाठी महापालिकेची आरोग्य यंत्रणा कशा पद्धतीने सज्ज आहे, याची माहिती आयुक्तांनी दिली. परंतु, फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपासून ठाण्यात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढताना दिसत आहेत. आजघडीला रोजच्या रोज २०० ते ३०० रुग्ण आढळत आहेत. त्यांच्यावर उपचारासाठी कोविड सेंटर सज्ज ठेवले आहेत. ॲम्ब्युलन्स, औषधांचा साठा, क्वॉरंटाइन सेंटरदेखील सज्ज आहेत. परंतु, असे असले तरी आजही ठाण्याच्या बाजारपेठा, बस किंवा इतर ठिकाणीदेखील नागरिक गर्दी करून मास्कचा वापर कमी करताना दिसत आहेत. इतर शहरांतदेखील अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे लॉकडाऊन करायचे नसेल, तर नागरिकांनी जबाबदारीने वागणे गरजेचे असल्याचे मत म्हस्के यांनी व्यक्त केले.