लॉकडाऊनमुळे परिस्थिती खालावली; जुगारात मात्र हजारोंच्या उलाढाली, मंडपात रंगले पत्त्यांचे डाव
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 12:48 AM2020-08-27T00:48:27+5:302020-08-27T00:48:42+5:30
शासकीय निर्देशानुसार भक्तांनी उत्सव साजरा करण्यासाठी यावर्षी अनेक प्रकारचे बदल केले आहेत. मूर्तींची उंची कमी केली असून, दर्शन घेण्यासाठी येत असलेल्या भक्तांची गर्दी होऊ नये, यासाठी स्वयंसेवक काळजी घेत आहेत.
कुमार बडदे
मुंब्रा : शासकीय दिशानिर्देशानुसार यावर्षी साजऱ्या होत असलेल्या गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळांनी अनेक बदल केले असले, तरी बहुतांश मंडळांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना हवाहवासा वाटणारा तो कोपरा मात्र तसाच ठेवला असून, तेथे गणेश चतुर्थीपासून पत्त्यांचे डाव रंगत आहेत. या डावांमध्ये दररोज हजारो रुपयांची उलाढाल होत आहे.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लाखो जणांवर बेकारीची कुºहाड कोसळली आहे. यामुळे अनेकांची आर्थिक स्थिती खालावली असल्याची ओरड सुरू असतानाच गणेशोत्सवादरम्यान सुरू असलेल्या जुगारामध्ये मात्र दररोज हजारो रुपयांची देवाणघेवाण होत असल्याबद्दल सर्वसामान्य नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत.
राज्यातील बहुतांश नागरिक ज्या उत्सवाची वर्षभर आतुरतेने प्रतीक्षा करतात, तो गणेशोत्सव सध्या राज्यात उत्साहात सुरू आहे.कोरोनामुळे शासनाने उत्सवाबाबत विविध प्रकारचे निर्बंध लागू केले आहेत. त्याचा तसूभरही परिणाम बाप्पाच्या भक्तांवर झाला नसून सरकारने आखून दिलेल्या दिशानिर्देशांचे पालन करून उत्सव उत्साहात सुरू आहे.
शासकीय निर्देशानुसार भक्तांनी उत्सव साजरा करण्यासाठी यावर्षी अनेक प्रकारचे बदल केले आहेत. मूर्तींची उंची कमी केली असून, दर्शन घेण्यासाठी येत असलेल्या भक्तांची गर्दी होऊ नये, यासाठी स्वयंसेवक काळजी घेत आहेत.
मंडपांचा व्यासदेखील कमी केला असला, तरी अनेकांनी प्रतिवर्षाप्रमाणे डाव खेळण्यासाठी ठेवण्यात येणारा एक कोपरा मात्र पूर्वीप्रमाणेच ठेवला आहे. त्या ठिकाणी सध्या रात्री ११ ते सकाळी ७ वाजेपर्यंत रमी, तीनपत्त्यांचे डाव रंगत आहेत.
ते फक्त मनोरंजनासाठी खेळले जात असल्याचे कार्यकर्ते पोटतिडकीने सांगत असले, तरी बहुतांश ठिकाणी खेळादरम्यान पैशांचा व्यवहार होत असून खेळामध्ये रंक होणारा दुसºया दिवशी साव होण्यासाठी पुन्हा खेळण्यासाठी पुन्हा येत असल्याचे निदर्शनास येत आहे.