ठाकुर्लीतील पदपथांवरील झाकणे तुटली, केडीएमसीचे होतेय दुर्लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 01:06 AM2019-05-08T01:06:03+5:302019-05-08T01:06:18+5:30
ठाकुर्ली पूर्वेतील रेल्वे समांतर रस्त्याकडे केडीएमसीचे पुरते दुर्लक्ष झाले आहे. म्हसोबा चौकातील पदपथावरील काही झाकणे तुटली आहेत, तर काही ठिकाणी ती गायब झाली आहेत.
डोंबिवली - ठाकुर्ली पूर्वेतील रेल्वे समांतर रस्त्याकडे केडीएमसीचे पुरते दुर्लक्ष झाले आहे. म्हसोबा चौकातील पदपथावरील काही झाकणे तुटली आहेत, तर काही ठिकाणी ती गायब झाली आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना पदपथावरून चालणे मुश्किल झाले आहे. तर, दुसरीकडे झाकणे गायब झाल्याने धोक्याची सूचना म्हणून त्यावर ‘नो-पार्किंग’चा फलक आडवा करून ठेवला आहे.
रेल्वे समांतर रस्ता आणि ९० फुटी रस्त्यालगत मोठमोठी गृहसंकुले उभी राहत आहेत. त्यामुळे येथे लोकवस्ती झपाट्याने वाढत आहे. या वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात येथे पुरेशा सुविधा दिलेल्या नाहीत. वाहनतळ नसल्याने चाकरमानी सकाळी म्हसोबा चौकातच आपली वाहने उभी करून ठाकुर्ली स्थानक गाठतात. वाढत्या दुचाकींमुळे तेथे वाहतुकीचे नियोजन योग्य प्रकारे व्हावे, यासाठी काही महिन्यांपूर्वी केडीएमसीने नो-पार्किंगचे फलक म्हसोबा चौकात लावले होते. परंतु, ठोस कृतीअभावी निरूपयोगी ठरलेले ते फलक आता पदपथावरील गायब झालेल्या झाकणांच्या ठिकाणी उपयोगात आणले जात आहेत.
या फलकांची दांड्यासकट मोडतोड करून वापर केला गेल्याचेही स्पष्ट होत आहे. त्याचबरोबर तुटलेल्या झाकणांच्या ठिकाणी गोणपाट तसेच फडक्याचा वापर केला गेला आहे. या पदपथाचा वापर पादचारी, सकाळी-सायंकाळी वॉकला जाणारेही करतात. परंतु, गटारांकडे केडीएमसीचे दुर्लक्ष झाल्याने अपघाताची शक्यता आहे.
दरम्यान, बेकायदा ढाबे, टपऱ्यांचे साम्राज्य येथे वाढलेले असताना आजूबाजूला निर्माण होत असलेला कचरा रस्त्यालगतच्या झाडांच्या भोवताली असलेल्या ट्री-गार्डमध्ये सर्रासपणे गोळा केला जात आहे.
कच-याचे ढिग
नवीन ठाकुर्ली परिसराला कार्पाेरेट लूक लाभला असलातरी कल्याण दिशेने जाणाºया मार्गालगतच्या भिंतीच्या पलिक डे मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जात आहे. त्यामुळे या मार्गावर काही ठिकाणी कचºयाचे ढिग साचले आहेत. या परिसरात सायंकाळी तरुण-तरुणी व ज्येष्ठ नागरिक विरंगुळ्यासाठी येतात. मात्र, त्यांना कचºयाच्या दुर्गंधीमुळे नाक मुठीत धरून वावरावे लागत आहे. तसेच डासांचाही त्रासही त्यांना होत आहे.
‘शिवमार्केट’मधील पदपथ धोकादायक
पूर्वेतील शिवमार्केट प्रभागातील टाटा पॉवर लेन परिसरातील आस्था रुग्णालय आणि फतेह अली रोडवरील मशिदीनजीकच्या पदपथावरील गटारांची झाकणे तुटली आहेत. त्यामुळे ती तातडीने बदलण्याची मागणी होत आहे.
आस्था रुग्णालयानजीकच्या पदपथावरील गटाराचे झाकण तुटल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. त्यामुळे जुने झाकण तत्काळ बदलावे. अन्य ठिकाणीही तातडीने चांगल्या दर्जाची झाकणे बसवावीत, अशी मागणी डॉ. मंगेश पाटे यांनी केली आहे.
नगरसेवक विश्वदीप पवार म्हणाले, पालिकेकडे ५० झाकणे मागितली होती. परंतु, अवघी सात मिळाली. आता पुन्हा झाकणे मागितली आहेत. तुटलेली झाकणे तत्काळ बदलली जातील.