मीरा-भाईंदरमध्ये बंदी असूनही लॉजिंग सुरू; लॉजवाल्यांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 08:29 PM2020-06-11T20:29:49+5:302020-06-11T20:36:02+5:30
काशिमीरा येथील एका लॉजवर कारवाई करण्यात आली. लॉजमधील जोडप्यासह व्यवस्थापक तसेच चालक-मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मीरा रोड - कोरोनाचा संसर्ग एकीकडे झपाट्याने फोफावत असताना दुसरीकडे बंदी असून देखील शहरातील लॉज मात्र खुलेआम सुरू आहेत. याबाबतची माहिती थेट ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ . शिवाजी राठोड यांच्यापर्यंत गेल्यावर काशिमीरा येथील एका लॉजवर कारवाई करण्यात आली. लॉजमधील जोडप्यासह व्यवस्थापक तसेच चालक-मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर स्थानिक पोलीस आणि पालिकेचा याकडे चाललेला काणाडोळा उघड झाला आहे.
मीरा-भाईंदर हे ऑर्केस्ट्रा बार, लॉज यातून चालणाऱ्या अनैतिक व्यवसायामुळे नेहमीच बदनामीच्या छायेत असते. बहुतांश बांधकामे अनधिकृत असूनही त्यावर महापालिका ठोस कारवाई करत नाही तर लोकप्रतिनिधी देखील सोयीस्कर डोळेझाक करतात. शहर पर्यटन स्थळ नसले तरी लॉज मात्र गल्लीबोळात सापडतात. महामार्ग पट्टा तर जणू लॉज-ऑर्केस्ट्रा बारनेच भरलेला आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे लॉजिंग सुरू करण्यास अजूनही परवानगी दिलेली नसताना देखील लॉज मात्र बेधडक सुरू केल्याच्या तक्रारी येऊ लागल्या. त्यातही लॉजच्या वेटर आदींच्या संगनमताने वेश्यागमनासाठी मुली पुरवल्या जात असल्याचेसुद्धा चर्चेला आले.
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेसह स्थानिक पोलीस व पालिका अधिकाऱ्यांकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे तसेच लॉज सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक शिवाजी राठोड यांना मिळाली. राठोड यांच्या आदेशाने मीरा गाव महामार्गावरील समाधान लॉजवर बुधवारी रात्री धाड टाकण्यात आली . त्यावेळी लॉज सुरू असल्याचे तसेच आत एक जोडपे आढळून आले. या प्रकरणी आपत्ती व्यवस्थापनासह अन्य कलमांखाली काशिमीरा पोलीस ठाण्यात समाधान लॉजचा मालक, चालक व व्यवस्थापक अजित सोनार आणि एका जोडप्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.