भिवंडीतून लोकसभेकरिता आर. सी. पाटील उत्सुक काका-पुतण्यात चुरस : भाजपाचे खासदार कपिल पाटील यांच्या घरातून आव्हान
By सुरेश लोखंडे | Published: February 25, 2018 03:30 PM2018-02-25T15:30:18+5:302018-02-25T15:30:18+5:30
भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष असलेले आर.सी.पाटील हे भिवंडीचे विद्यमान खासदार कपिल पाटील यांचे सख्खे काका आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू असल्यामुळे राजकीय पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे. भिवंडी मतदारसंघ जवळचा असल्याने २०१९ च्या निवडणुकीसाठी आर.सी.पाटील हेदेखील इच्छुक आहेत
सुरेश लोखंडे
ठाणे : एकेकाळी जिल्ह्याच्या राजकारणावर जबरदस्त पकड असलेले व टीडीसीसी बँकेवर दीर्घकाळ सत्ता उपभोगलेले भिवंडी येथील आर.सी.पाटील व सध्याचे भाजपाचे विद्यमान खासदार कपिल पाटील, या दोघा काका-पुतण्यात आगामी लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरुन भाजपात स्पर्धा रंगणार असल्याची चर्चा आहे.
भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष असलेले आर.सी.पाटील हे भिवंडीचे विद्यमान खासदार कपिल पाटील यांचे सख्खे काका आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू असल्यामुळे राजकीय पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे. भिवंडी मतदारसंघ जवळचा असल्याने २०१९ च्या निवडणुकीसाठी आर.सी.पाटील हेदेखील इच्छुक आहेत. आगामी निवडणुकीकरिता भाजपात भिवंडीच्या जागेवरुन काका- पुतण्यातच स्पर्धा रंगणार असल्याचे संकेत मिळत आहेत. भिवंडी लोकसभा मतदारसंघात आगरी समाज मोठ्या संख्येने आहे. आर.सी.पाटील यांच्या कृपाशीर्वादासह ग्रामीण भागातील भाजपाच्या वर्चस्वामुळे कपिल पाटील हे भिवंडी मतदारसंघात विजयी झाले. याच मतदारसंघात आता उमेदवारी मिळवण्याकरिता आर.सी. पाटील इच्छुक आहेत.
ठाणे जिल्ह्यातील भाजपाची सूत्रे ताब्यात दिलेल्या खासदार कपिल पाटील यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील भिवंडी महापालिका व ठाणे जिल्हा परिषदेवर भाजपाची सत्ता मिळवता आलेली नाही. भाजपाची ताकद जिल्ह्यात कमी पडत असल्याचे बोलले जात आहे. शहापूर तालुक्यातील मोठ्या उद्योगाचे प्रमुख असलेला एक उद्योगपती कपिल पाटील यांच्यावर नाराज असल्याची चर्चा आहे. शिवाय मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांच्यासोबतही खासदारांचे जिव्हाळ्याचे संबंध नाहीत. तसेच राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे नेते आणि राज्यसभेचे खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांना सुद्धा कपिल पाटील यांची कार्यपद्धती आवडत नसल्याची चर्चा असून यामुळेच त्यांनी शहापूर तालुक्यातील दत्तक घेतलेल्या विही गावाच्या कार्यक्रमापासून त्यांना दूर ठेवले होते. लागोपाठच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आर.सी. पाटील यांचे नाव चर्चेत आले आहे.
.................
* लोकसभेच्या निवडणुकीला अजून दीड वर्ष बाकी आहे. वेळ आल्यावर नक्कीच बोलू. आपल्या शुभेच्छा असून द्या
- आर.सी.पाटील
.................
* आर.सी. पाटील भाजपात असले तरी ते कोणत्या जागेवरुन निवडणूक लढवणार हे मला माहीत नाही. ते त्यांनाच विचारलेले बरे
- खासदार कपिल पाटील.