कल्याणसह मुंबई झोनच्या लोकसभा बीएसपी लढणार - डॉ प्रशांत इंगळे
By सदानंद नाईक | Published: March 26, 2024 07:33 PM2024-03-26T19:33:43+5:302024-03-26T19:34:22+5:30
राज्यात तिसरी आघाडीचा पर्याय बीएसपी देणार असून लवकरच उमेदवार जाहीर होण्याचे संकेत इंगळे यांनी दिले आहे.
उल्हासनगर : बीएसपीचे प्रदेश महासचिव व मुंबई झोनचे प्रमुख डॉ प्रशांत इंगळे यांनी मंगळवारी दुपारी पत्रकार परिषद घेऊन कल्याणसह मुंबई झोन मधील लोकसभेत पक्ष उमेदवार उभे करण्याची माहिती दिली. राज्यात तिसरी आघाडीचा पर्याय बीएसपी देणार असून लवकरच उमेदवार जाहीर होण्याचे संकेत इंगळे यांनी दिले आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-४ येथे बीएसपीचे प्रदेश महासचिव व मुंबई झोनचे प्रमुख प्रशांत इंगळे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. बीएसपी पक्ष कल्याणसह मुंबई झोन मधील लोकसभा स्वबळावर लढणार असून नागरिकांना निवडणुकीत तिसरा पर्याय देणार असल्याचे सांगितले. कल्याण लोकसभेसह मुंबई झोन मधील लोकसभा मतदारसंघात हजारो कोटीचे विकास कामे सुरू असल्याचे सत्ताधारी पक्षाचे नेते सांगत आहेत. त्यांचे सांगणे विरोधी पक्षाला खोडता येत नाही. मात्र खरोखर हजारो कोटीच्या निधीतून विकास कामे होऊन शहराचा विकास दिसतो का? असा प्रश्न डॉ प्रशांत इंगळे यांनी यावेळी केला.
बहुजन समाज पक्षाने घेतलेल्या पत्रकार परिषेदेत ठाणे जिल्हा प्रभारी सुनील मडके, कल्याण लोकसभा अध्यक्ष विनोद भालेराव, ठाणे लोकसभा प्रभारी मधुकर बनसोड यांच्यासह रमेश धनवे, सिध्दार्थ सोनावणे, रविकिरण बनसोडे, दीपक जाधव आदीजन उपस्थित होते. या आठवड्यात पक्ष प्रमुख मुंबई झोन लोकसभा मधील उमेदवार घोषित करणार असल्याचे पक्षाचे प्रदेश महासचिव व मुंबई झोन प्रमुख प्रशांत इंगळे यांनी सांगितले.