मतदारांना बाहेर काढा अन्यथा तुम्हाला तिकीट देण्यासाठी विचार करावा लागेल; विनोद तावडे यांचा इशारा

By अजित मांडके | Published: May 16, 2024 04:37 PM2024-05-16T16:37:45+5:302024-05-16T16:39:49+5:30

भाजपचे नेते विनोद तावडे यांनी देखील भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन हाच इशारा आपल्या पक्षातील माजी नगरसेवकांना दिला आहे. 

lok sabha elction 2024 bjp vinod tawde give warning to former corporators of his party | मतदारांना बाहेर काढा अन्यथा तुम्हाला तिकीट देण्यासाठी विचार करावा लागेल; विनोद तावडे यांचा इशारा

मतदारांना बाहेर काढा अन्यथा तुम्हाला तिकीट देण्यासाठी विचार करावा लागेल; विनोद तावडे यांचा इशारा

अजित मांडके, ठाणे : मतदारांना जास्तीत जास्त संख्येने बाहेर काढून मतदानाचा टक्का वाढवा अन्यथा तुम्हाला तिकीट द्यायचे की नाही? याचा विचार करावा लागेल असा इशारा काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षातील नगरसेवकांना दिला होता. त्यानंतर आता भाजपचे नेते विनोद तावडे यांनी देखील भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन हाच इशारा आपल्या पक्षातील माजी नगरसेवकांना दिला आहे. 

प्रत्येक नगरसेवकाने किती मतदारांना बाहेर काढले, त्यांच्या प्रभागातून उमेदरावाला किती मतदान झाले, याचा अभ्यास केला जाणार असून त्यानंतरच आगामी निवडणुकीत तिकीट द्यायचे की नाही? याचा विचार केला जाईल असा इशारा दिला आहे.

ठाणे लोकसभेचे शिंदे सेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांना तिकीट जाहीर झाल्यानंतर भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी दिसून आली. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय पातळीवरील नेते देखील येऊन गेले होते. त्यानंतर गुरुवारी दुपारी विनोद तावडे यांनी भाजपच्या ठाणे पक्ष कार्यालयात पदाधिकाºयांची आणि माजी नगरसेवकांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न करा, मतदारांना बाहेर काढा, महायुतीच्या उमेदवाराला अधिकाअधिक मताधिक्य कसे देता येईल यासाठी प्रयत्न करा अशा महत्वाच्या सुचना दिल्या असल्याची माहिती भाजपच्या सुत्रांनी दिली.

दुसरीकडे काही पदाधिकाऱ्यांनी पुन्हा ठाणे लोकसभेबाबत नाराजी व्यक्त केल्याचेही दिसून आले. यावेळी काही पदाधिकाऱ्यांनी ठाणे लोकसभा आपणच लढवायला हवी होती, ठाण्यात आपली ताकद वाढली असतांना पुन्हा धनुष्यबाणासाठी आपण का काम करायचे असा सुरही काही जणांनी लावला. मात्र, आपण महायुतीत आहोत, महायुतीसाठी आणि मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी लढायचे असल्याचे सांगत तावडे यांनी या नाराजांची देखील नाराजी दूर केल्याचे बोलले जात आहे. तसेच प्रत्येक माजी नगरसेवकाने, पदाधिकाऱ्याने आप-आपल्या भागातून मतदारांना मतदानासाठी बाहेर काढायचे असून मतदानाचा टक्का वाढवायचा आहे, कमी मतदान झाले तर पुढील निवडणुकीत तिकीट द्यायचे की नाही? या बाबत विचार करावा लागेल असा इशाराही त्यांनी दिल्याचे भाजपच्या सुत्रांनी सांगितले.

Web Title: lok sabha elction 2024 bjp vinod tawde give warning to former corporators of his party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.