Lok Sabha Election 2019: ठाण्यातून आनंद परांजपे; तर कल्याणमधून बाबाजी पाटील?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 05:44 AM2019-03-12T05:44:26+5:302019-03-12T05:44:56+5:30
राजन विचारे, डॉ. श्रीकांत शिंदे यांना देणार आव्हान
ठाणे : लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजताच ठाणे लोकसभा मतदारसंघातून शिवसेना-भाजपा युतीचे संभाव्य उमेदवार व विद्यमान खासदार राजन विचारे यांचा सामना करण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीचे उमेदवार या नात्याने आनंद परांजपे यांना संधी दिली जाणार आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा युतीचे संभाव्य उमेदवार व विद्यमान खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात राष्टÑवादीचे नगरसेवक बाबाजी पाटील यांचे नाव येथे अंतिम झाले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. या दोघांच्या उमेदवारीची केवळ औपचारिक घोषणा शिल्लक आहे. त्यामुळे आता हळूहळू निवडणुकीतील लढतींचे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे.
शिवसेना व भाजपाची युती झाल्याने आणि पाकिस्तानवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर लोकशाही आघाडीत या दोन्ही मतदारसंघांतील उमेदवारांबाबत अनिश्चितता कायम होती. ठाणे लोकसभा मतदारसंघातून गणेश नाईक यांनी, तर कल्याण लोकसभा मतदारसंघातून जितेंद्र आव्हाड यांनी ही निवडणूक लढवावी, अशी पक्षश्रेष्ठींची प्रारंभी तीव्र इच्छा होती. नाईक यांच्यासाठी तर शेवटच्या क्षणापर्यंत श्रेष्ठी आग्रही होते. परंतु, या दोघांनी राज्याच्या राजकारणातून दूर जाण्यास नम्रपणे नकार दिल्याने अखेर ठाणे लोकसभा मतदारसंघातून आनंद परांजपे यांचे नाव अंतिम झाले आहे. तर, कल्याण लोकसभा मतदारसंघातून बाबाजी पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे.
याचसंदर्भात सोमवारी ठाण्यातील एका हॉटेलमध्ये गणेश नाईक, जितेंद्र आव्हाड, आनंद परांजपे, गटनेते हणमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील आणि नजीब मुल्ला यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत परांजपे आणि पाटील यांच्या नावांवर शिक्कामोर्तब होणार असल्याचे निश्चित झाले होते. परंतु, आव्हाड यांना मुंबईत कामानिमित्त जावे लागल्याने आणि नाईक गैरहजर राहिल्याने त्यावर शिक्कामोर्तब होऊ शकले नाही. मात्र, नवी मुंबईत आव्हाड आणि नाईक यांच्यात सायंकाळी बैठक झाली असून या दोन्ही नावांवर एकमत झाल्याची माहिती राष्टÑवादीच्या सूत्रांनी दिली. त्यामुळे आता केवळ औपचारिक घोषणाच शिल्लक आहे.
दोघांनाही मतदारसंघ नवीन
आनंद परांजपे यांनी यापूर्वी कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, आता ठाणे लोकसभा हा त्यांच्यासाठी नवा मतदारसंघ असणार आहे, तर बाबाजी पाटील ठाणे महापालिकेत नगरसेवक असून त्यांच्यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघ हा फारच नवीन आहे. परांजपे यांनी ठाणे शहरात सातत्याने केंद्र सरकारविरोधात केलेल्या आंदोलनांमुळे त्यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली असल्याचे समजते. दोन्ही उमेदवारांसमोर विद्यमान खासदारांचे आव्हान आहे. ते युतीच्या उमेदवाराला कशी टक्कर देतात, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.